Bihar Assembly Election Result Updates : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरी (Bihar Vidhan Sabha Nivadnuk Nikal Updates) पुन्हा एकदा अत्यंत निराशाजनक ठरल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्यांकडून विरोधी पक्ष आणि विशेषतः राहुल गांधींची जोरदार खिल्ली उडवण्यात येत आहे. बिहारमध्ये एनडीए (NDA) प्रचंड मोठे बहुमत मिळवण्याकडे वाटचाल करत असताना, भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्याने होणाऱ्या निवडणुकीतील पराभवाचे प्रतीक बनल्याचा दावा केला आहे.
भाजपचा राहुल गांधींवर हल्ला
भाजपच्या अनेक नेत्यांनी सोशल मीडिया आणि माध्यमांद्वारे राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली पक्षाला आणि आघाडीला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत असल्याने त्यांना टीकेचे लक्ष्य करण्यात आले आहे. एका भाजप नेत्याने खोचक टीका करताना म्हटले आहे, “राहुल गांधी! आणखी एक निवडणूक, आणखी एक पराभव! जर निवडणुकीतील पराभवाच्या सातत्यासाठी पुरस्कार असते, तर सर्वच पुरस्कार त्यांनाच मिळाले असते. या वेगाने, पराभवांनाही आश्चर्य वाटत असेल की, ते इतक्या खात्रीपूर्वक पद्धतीने त्यांच्यापर्यंत कसे पोहोचतात.”
तब्बल 95 पराभव
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी देखील राहुल गांधींवर “राहुल गांधी हे नंबर 1 आहेत – निर्विवाद, अद्वितीय, आणि अपराजित (हारण्याच्या विक्रमात)” असे म्हणत खोचक टीका केली आहे. “95 निवडणुकांमध्ये पराभव आणि ही संख्या वाढतच आहे. जवाहरलाल नेहरूच्या जयंतीदिनीच हे घडावे, हा काही योगायोग नाही,” असेही ते म्हणाले.
Rahul Gandhi!
Another election, another defeat!
If there were awards for electoral consistency, he’d sweep them all.
At this rate, even setbacks must be wondering how he finds them so reliably. pic.twitter.com/y4rH6g62qG — Amit Malviya (@amitmalviya) November 14, 2025
कबीर दासांच्या ओळी
भाजपचे नेते, प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी तर कबीर दासांच्या दोन ओळी ऐकवत काँग्रेसची खिल्ली उडवली. ते म्हणाले, “आम्ही आता 200 च्या दिशेने वाटचाल करत आहोत. मला काँग्रेससाठी कबीर दासांची एक ओळ कोट करायची आहे, त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, ‘बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय। जो मन खोजा अपना, तो मुझसे बुरा न कोय।’” (जेव्हा मी वाईट व्यक्ती शोधायला निघालो, तेव्हा मला कोणीही वाईट आढळले नाही. पण जेव्हा मी स्वत:च्या मनात डोकावून पाहिले, तेव्हा माझ्यापेक्षा वाईट कोणी नव्हते, असे लक्षात आले)
काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
बिहारमध्ये काँग्रेसचे स्टार प्रचारक (Star Campaigner) राहुल गांधी यांनी अनेक सभांमधून ‘वोट चोरी’चा मुद्दा उपस्थित केला होता आणि निवडणूक आयोग भाजपच्या विजयासाठी काम करत असल्याचा आरोप केला होता. या निकालावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया निवडणूक आयोगावर थेट हल्ला करणारी आहे.
ज्ञानेश कुमार यांच्यावर आरोप: काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी असा दावा केला आहे की, बिहारमधील खरी लढाई एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये नाही, तर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि भारतातील नागरिकांमध्ये आहे.
Rahul Gandhi is No 1- Undisputed, unchallenged, unbeaten. 95 Elections lost & counting ? Its not a coincidence its Jawaharlal Nehru ji's birthday today. ? pic.twitter.com/TpEEo9B7J7 — Pradeep Bhandari(प्रदीप भंडारी)?? (@pradip103) November 14, 2025
पंतप्रधानांना खूश ठेवण्याचे काम
पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना पवन खेरा म्हणाले, “सुरुवातीच्या कलांवरून असे दिसून येते की ज्ञानेश कुमार बिहारच्या लोकांवर प्रभाव पाडत आहेत. एसआयआर आणि ‘वोट चोरी’सारख्या मुद्द्यांना न जुमानता लोकांनी मोठे धाडस दाखवले आहे… ‘टू सर्व्ह विथ लव्ह’ नावाचे एक पुस्तक आहे. ज्ञानेश कुमार गुप्ता हे पुस्तक पंतप्रधान मोदींसाठी लिहीत आहेत,” असे म्हणत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर टीका केली.
बिहारमधील निकालाचे चित्र
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए मतदान मोजणी सुरू झाल्यापासून आघाडीवर आहे. सध्या एनडीए 199 जागांवर आघाडीवर आहे, तर आरजेडीच्या नेतृत्वाखालील महागठबंधनला केवळ 38 जागांवर आघाडी मिळाली आहे. महागठबंधनमध्ये काँग्रेसला अवघ्या 4 जागांवर आघाडी आहे. एनडीएमध्ये भाजप 90, जेडीयू 81 आणि चिराग पासवान यांची एलजेपी 21 जागांवर आघाडीवर आहे.