Sunday, June 29, 2025 11:18:20 PM

आता मोबाईलद्वारे मतदानाची नांदी बिहारमध्ये स्थानिक निवडणुकीत वापर

बिहारमध्ये मोबाइलद्वारे मतदानाची सुविधा सुरू; पाटणा, रोहतास, चंपारणमधील नगरपालिका निवडणुकीत वापर, 10 हजारांहून अधिक मतदारांची नोंदणी.

आता मोबाईलद्वारे मतदानाची नांदी बिहारमध्ये स्थानिक निवडणुकीत वापर

बिहार: मतदान होत असलेल्या शहरापासून अथवा तेथील मतदान केंद्रापासून काही कारणांमुळे दूर असलेल्या मतदारांना मोबाईलद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देणारे बिहार हे देशातील पहिले राज्य ठरले. पाटणा, रोहतास आणि पूर्व चंपारणमधील सहा नगरपालिका निवडणुकांसाठी शनिवारी ही प्रक्रिया पार पडली. येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने देशात मोबाइलद्वारे मतदानाची नांदी झाली.

तीन जिल्ह्यांतील सहा नगरपालिका निवडणुकीसाठी ही सुविधा वापरण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त दीपक प्रसाद यांनी शुक्रवारी सांगितले होते. त्याप्रमाणे आज (ता. 28 ) मतदान पार पडले. याच वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. बिहारमधील हा अनोखा प्रयोग देशभर चर्चेचा विषय ठरला आहे. प्रसाद यांनी नवीन 'ई-व्होटिंग' प्रक्रियेची माहिती देताना सांगितले, 'जे मतदार मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊ शकत नाहीत,
ते अशा प्रकारे मतदान करू शकतात. 

हेही वाचा:अमरावतीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची निर्घृण हत्या; तीन आरोपी अटकेत

सुरक्षित कार्यप्रणाली
एका मोबाइल क्रमांकावरून केवळ दोन नोंदणीकृत मतदारच लॉगिन करू शकतात.प्रत्येक मतदाराचे मतदार ओळखपत्र आणि इतर तपशिलाची फेर पडताळणी होते.'ब्लॉकचेन' तंत्रज्ञानामुळे मते सुरक्षित राहतात, त्यामध्ये बदल करता येत नाही. 

वेबसाईटद्वारेही मतदान
'मतदान प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी एका मोबाईल क्रमांकावरून फक्त दोन नोंदणीकृत मतदार लॉगिन करू शकतील. तथापि, प्रत्येक मताची वैधता वैयक्तिक ओळखपत्रांवरून पडताळून पाहण्यात येईल,' असे सांगण्यात आले. 'ज्या मतदारांकडे मोबाईल फोन नाही, ते बिहार राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटद्वारे मतदान करू शकतील,' असेही निवडणूक आयोगाने सांगितले.

त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. मतदारांना त्यांच्या फोनवर स्वतंत्र अॅप इन्स्टॉल करून त्याद्वारे मतदान करता येईल. ही सुविधा शारीरिक किंवा भौगोलिक कारणांमुळे मतदान केंद्रावर पोहोचू न शकणाऱ्या मतदारांसाठी आहे. या यंत्रणेद्वारे आधीच अंदाजे 10 हजार मतदारांनी नोंदणी केली आहे, तर आणखी 50 हजार मतदार मतदान केंद्रावर न जाता वेबसाईटच्या माध्यमातून मतदान करण्याची अपेक्षा आहे.
 


सम्बन्धित सामग्री