Bihar Cabinet Formation: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीने बहुमत मिळवल्यानंतर सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. घटक पक्षांमधील बैठकांची आणि चर्चांची मालिका सुरू असून, नवीन मंत्रिमंडळाची रूपरेषा जवळपास अंतिम झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. युतीतील प्रत्येक पक्षाला त्यांच्या आमदारसंख्येनुसार मंत्रिपदे दिली जाणार असून, या फॉर्म्युल्यावर सर्व पक्षांनी सहमती दर्शवली आहे.
सहा आमदारांसाठी एक मंत्री फॉर्म्युला
सूत्रांच्या माहितीनुसार, एनडीए सरकारमध्ये प्रत्येक सहा आमदारांमागे एक मंत्रीपद देण्याचा फॉर्म्युला स्वीकारला जाऊ शकतो. या तत्त्वावर आधारित मंत्रिमंडळाचा संभाव्य आकडा पुढीलप्रमाणे असू शकतो :
भाजप – 15 ते 16 मंत्री
जेडीयू – 14 मंत्री
एलजेपी (रामविलास) – 3 मंत्री
आरएलएम – 1 मंत्री
एचएएम – 1 मंत्री
एनडीएच्या बैठकीत या फॉर्म्यूल्याला हिरवा कंदील मिळाल्याचे संकेत आहेत. त्यामुळे मंत्रीपद वाटपाचा ताण-तणाव कमी होऊन आता शपथविधी सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष वळले आहे. नवीन सरकारच्या शपथविधीबाबत विचारले असता केंद्रीय मंत्री आणि एलजेपी (आर) चे प्रमुख चिराग पासवान म्हणाले, 'चर्चा सुरू आहे. आराखडा आज किंवा उद्यापर्यंत अंतिम होईल. आज रात्री वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांशीही माझी चर्चा होईल. 22 नोव्हेंबरपूर्वी नवीन सरकार स्थापन होणार यात शंका नाही.'
हेही वाचा - Bihar Government Formulation : बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेसाठी हालचालींना वेग; मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित
दरम्यान, राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनीही सरकार स्थापनेबाबत महत्त्वाचे संकेत दिले. ते म्हणाले, 'जनतेचे मनापासून आभार. नवीन सरकारची औपचारिकता 2-4 दिवसांत पूर्ण होईल. नितीश कुमार मुख्यमंत्रिपदासाठी आमची पहिली आणि कायम पसंती आहेत. ते मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील.' यावरून एनडीएतील सर्व पक्षांमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर एकमत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा - Raja Rammohun Roy Controversy : भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणे, 'राजा राम मोहन रॉय ब्रिटिशांचे एजंट...'
आगामी मंत्रिमंडळ कसे असेल?
राजकीय वर्तुळात असा अंदाज वर्तवला जात आहे की, या वेळचे मंत्रिमंडळ तुलनेने सुटसुटीत, तरुण आणि अनुभवी चेहऱ्यांचे मिश्रण असेल. युतीतील सर्व घटक पक्षांना योग्य न्याय देत सत्तेचा समतोल राखण्याचा प्रयत्न होणार आहे.