Bird Flu Outbreak: तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये बर्ड फ्लूच्या (H5N1) वाढत्या प्रादुर्भावामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहराच्या विविध भागांत शेकडो कावळे मृतावस्थेत आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. प्रयोगशाळेतील तपासणीनंतर या कावळ्यांचा मृत्यू H5N1 या घातक विषाणूमुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर तामिळनाडू सरकारने तातडीने आरोग्य सूचना (Advisory) जारी केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनाकडून कडक जैवसुरक्षा प्रोटोकॉल लागू
वाढता धोका लक्षात घेता आरोग्य विभागाने मृत पक्ष्यांची विल्हेवाट लावण्यासाठी कडक मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मृत कावळे आणि कोंबड्यांचे अवशेष जैवसुरक्षा प्रोटोकॉलनुसार सुरक्षितपणे जाळून टाकावेत किंवा खोल खड्ड्यात पुरावेत, असे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच, नागरिकांनी कोणत्याही मृत पक्ष्याला थेट स्पर्श करू नये किंवा त्यांना हाताळू नये, असा कडक सल्ला प्रशासनाने दिला आहे.
हेही वाचा - Chhatrapati Sambhajinagar : “तू कोणाला बोलशील तर…”, धमकी देत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार
केंद्र सरकारचे तामिळनाडू राज्याला पत्र
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाने तामिळनाडूच्या मुख्य सचिवांना विशेष पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे आणि क्षेत्रीय देखरेख (Field Surveillance) वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. स्थानिक प्रशासनाला त्यांच्या भागात पक्ष्यांच्या मृत्यूच्या नवीन घटना आढळल्यास त्याची तात्काळ माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.
H5N1 विषाणू: मानवांसाठी किती धोकादायक?
H5N1 हा इन्फ्लूएंझा 'A' विषाणूचा अत्यंत संसर्गजन्य प्रकार आहे, जो प्रामुख्याने कोंबड्या आणि वन्य पक्ष्यांमध्ये वेगाने पसरतो. हा विषाणू केवळ पक्ष्यांसाठीच नव्हे, तर मानवासाठीही घातक ठरू शकतो. जरी मानवांमध्ये याचा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी असले, तरी संसर्ग झाल्यास न्यूमोनियासारखे गंभीर श्वसनाचे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे खबरदारी म्हणून पक्ष्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे.