दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक पार पडली. आज सकाळपासून दिल्लीत मजमोजणीला सुरूवात झाली आहे. निकालामध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. मागील २७ वर्षांपासून भाजपाला दिल्लीत म्हणावं असं यश मिळालं नव्हतं. पण आता दिल्लीत भाजपाचं कमळ फुलताना पाहायला मिळत आहे. दिल्लीत आम आदमी पार्टीचा पराभव होत असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे. तर महाराष्ट्राप्रमाणे दिल्लीतही काँग्रेसच्या मतांचा आकडा लाजीरवाणा दिसून येत आहे.
यंदा दिल्लीत विधानसभा निवडणूक तिरंगी पार पडली. आम आदमी पार्टी आणि काँग्रेस लोकसभा निवडणूकीवेळी इंडिया आघाडीचा भाग होते. परंतु दिल्ली विधानसभा निवडणुकीला काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवली. राहुल गांधी आणि आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांनी प्रचारावेळी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र डागले. आता दिल्लीत तिरंगी लढतीचा फायदा भाजपाला होताना दिसत आहे.
हेही वाचा : Delhi Election Result : 'आप'चं गणित कुठे चुकलं की काय? काय असू शकतात मागे पडण्याची कारणं?
आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार भाजपाला ४७ जागा मिळाल्या आहेत. आम आदमी पक्षाला २३ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला अद्याप एकही जागा मिळवता आली नाही.
धक्कादायक बाब म्हणजे आपचे सर्वेसर्वा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. तीन टर्म दिल्लीत सत्ता उपभोगणाऱ्या आप पक्षाला यावेळी पराभव पत्कारावा लागेल अशी चिन्हे आहेत. तर आप पक्षाच्याच मनिष सिसोदिया यांचाही पराभव झाला आहे. ते जंगपुरा मतदारसंघातून दिल्ली विधानसभा निवडणुकीला उभे राहिले होते.
भाजप सत्तेत आल्यावर दिल्लीकरांना काय काय मिळणार?
दिल्लीत भाजपाची सत्ता आल्यावर दिल्लीकरांना काय मिळणार याविषयी भाजपाची सांगितले होते. महिलांना महिन्याला 2500 रुपये मिळणार आहेत. गर्भवती महिलांना 21 हजार रुपये मिळणार आहेत. वृद्धांना 2500 रुपये दरमहा पेंशन मिळणार आहे. गरीबांना सिलेंडरवर 500 रुपयांची सबसिडी मिळणार असल्याचेही भारतीय जनता पार्टीने सांगितले. तर 200 युनिटपर्यंत वीज मोफत देणार येणार आहे. महिन्याला 20 हजार लीटर पाणी मोफत देण्यात येणार आहे. आयुष्यमान योजनेसह एकूण 10 लाखांचं हेल्थ कव्हर भाजपा देणार आहे.