Amazon-Flipkart- JioMart ला मोठा दणका; अमान्य तणनाशकाची विक्री केल्याप्रकरणी CCPAकडून ‘इतक्या’ लाखांचा दंड

तपासात असे उघडकीस आले की, कीटकनाशक कायदा 1968 च्या अधिकृत अनुसूचीमध्ये 'सायक्लोसिनोन' या रसायनाचा समावेशच नाही. तरीही या तिन्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर हे तणनाशक विकले जात होते.
amazon
amazon

Amazon-Flipkart- JioMart Face Penalty by CCPA: ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांशी आणि शेतकऱ्यांशी संबंधित एका मोठ्या प्रकरणात ‘केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने’ (CCPA) ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांवर कठोर कारवाई केली आहे. विनानोंदणीकृत आणि अमान्य असलेल्या ‘सायक्लोसिनोन’ नावाच्या कृषी-रसायन उत्पादनाची थेट विक्री करणे आणि त्याची जाहिरातबाजी करणे या कंपन्यांना चांगलेच महाग पडले आहे. सीसीपीएने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) या कंपन्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये, तर जिओमार्टला (JioMart) 5 लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे.

नियमांची पायमल्ली आणि ‘क्रॉप केअर फेडरेशन’च्या तक्रारीनंतर कारवाई
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाकडे ‘क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडिया’ने या बेकायदेशीर ऑनलाईन विक्रीबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे झालेल्या तपासात असे उघडकीस आले की, कीटकनाशक कायदा 1968 च्या अधिकृत अनुसूचीमध्ये ‘सायक्लोसिनोन’ या रसायनाचा समावेशच नाही. तरीही या तिन्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर हे तणनाशक विकले जात होते. शिवाय त्याच्या ऑनलाईन लिस्टिंगमध्ये सक्रिय रासायनिक घटकांची (Active Ingredients) कोणतीही आवश्यक माहिती देण्यात आली नव्हती, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.

हेही वाचा – Cancer Drug Pricing Row: कर्करोगावरील औषधांच्या किमतींवरून वाद; 5100 रुपयांच्या गोळ्यांची रुग्णांना 78,400 रुपयांना विक्री

अमेझॉनवर हजारो ऑर्डर्सची नोंद; सीसीपीएचे कठोर आदेश
सीसीपीएच्या अधिकृत आदेशानुसार, अमेझॉनवर हा दंडात्मक आदेश 16 सप्टेंबर 2026 रोजी देण्यात आला, तर फ्लिपकार्ट व जिओमार्टबाबत 22 सप्टेंबर 2026 रोजी आदेश जारी करण्यात आला. तपासादरम्यान एकट्या अमेझॉनवरून या अमान्य तणनाशकाच्या तब्बल 38,410 ऑर्डर्स नोंदवल्या गेल्याचे आणि सुमारे 96.42 लाख रुपये मूल्याच्या 43,634 युनिट्सची विक्री झाल्याचे निष्पन्न झाले. या धक्कादायक आकडेवारीनंतर प्राधिकरणाने तिन्ही कंपन्यांना या उत्पादनाची विक्री व जाहिराती तात्काळ पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्लॅटफॉर्म्सचे सेल्फ-ऑडिट आणि 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश
भविष्यात अशा प्रकारचा गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीपीएने ई-कॉमर्स कंपन्यांना स्वतःच्या संपूर्ण प्लॅटफॉर्मचे ‘सेल्फ-ऑडिट’ (Self-Audit) करण्याचे आदेश दिले आहेत. या ऑडिटद्वारे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या किंवा ग्राहकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या इतर सर्व संशयास्पद उत्पादनांची ओळख पटवून ती हटवावी लागतील. याशिवाय केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल येत्या 15 दिवसांच्या आत सादर करण्याचे बंधनकारक निर्देशही या तिन्ही कंपन्यांना देण्यात आले आहेत.

हेही वाचा – Gold Price Today: एका आठवड्यात सोन्याच्या दरात 3160 रुपयांपर्यंत घट; पहा तुमच्या शहरातील ताजे दर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version