चेकबुक हरवणे किंवा चोरीला जाणे अनेकांना किरकोळ बाब वाटू शकते, मात्र प्रत्यक्षात ते मोठ्या आर्थिक धोक्याचे कारण ठरू शकते. चेकबुक चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागल्यास बनावट स्वाक्षरी करून खात्यातील रक्कम काढली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत निष्काळजीपणा किंवा उशीर महागात पडू शकतो. त्यामुळे चेकबुक हरवल्याचे लक्षात येताच घाबरून न जाता तात्काळ योग्य पावले उचलणे अत्यंत आवश्यक ठरते, अन्यथा काही मिनिटांतच बँक खाते रिकामे होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
चेकबुक हरवल्याची किंवा चोरी झाल्याची माहिती मिळताच सर्वप्रथम तुमच्या बँकेला त्वरित कळवणे गरजेचे आहे. बँकेच्या नियमांनुसार ग्राहकाने वेळेत माहिती दिली नाही आणि त्या दरम्यान फसवे व्यवहार झाले, तर त्याची काही प्रमाणात जबाबदारी ग्राहकावरही येऊ शकते. त्यामुळे संबंधित चेकबुक ब्लॉक करणे किंवा त्या चेक क्रमांकांवर स्टॉप पेमेंटची विनंती नोंदवणे हा सर्वात महत्त्वाचा पहिला टप्पा असतो.
आजच्या डिजिटल सुविधांमुळे चेकबुक ब्लॉक करणे अधिक सोपे झाले आहे. नेट बँकिंग किंवा बँकेच्या मोबाईल ॲपमध्ये लॉग-इन करून ‘Cheque Services’ किंवा ‘Stop Payment’ पर्याय निवडून आवश्यक माहिती भरल्यानंतर संबंधित चेक किंवा संपूर्ण चेकबुक तात्काळ ब्लॉक करता येते.
हेही वाचा: Internet Browser Upgraded: आता स्क्रीनला टच करण्याची गरज नाही! फक्त आवाजावर होईल वेब ब्राउझिंग, 'हा' ब्राउझर देणार गुगलला टक्कर
इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्यास बँकेच्या टोल-फ्री ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधूनही चेकबुक ब्लॉक करण्याची विनंती करता येते. ओळख पडताळणीसाठी बँक अधिकारी काही प्रश्न विचारतात आणि योग्य माहिती दिल्यानंतर प्रक्रिया पूर्ण केली जाते. तसेच जवळच्या बँक शाखेत जाऊन लेखी अर्ज देऊनही स्टॉप पेमेंटची नोंद करता येते.
चेकबुक चोरीला गेल्याचा संशय असल्यास किंवा इतर कागदपत्रेही हरवली असल्यास पोलिसांत तक्रार नोंदवणे अधिक सुरक्षित ठरते. पोलिसांकडून मिळणारी तक्रार नोंद भविष्यात कोणताही वाद निर्माण झाल्यास महत्त्वाचा पुरावा ठरू शकते. चेकबुक ब्लॉक झाल्यानंतर बँकेकडून एसएमएस किंवा ई-मेलद्वारे लेखी पुष्टी घेणेही आवश्यक आहे, कारण पुढील काळात याचा उपयोग होऊ शकतो.
यानंतर त्वरित नवीन चेकबुकसाठी अर्ज करावा आणि नवीन चेक क्रमांक सुरक्षितरीत्या नोंदवून ठेवावेत. वेळेत बँकेला माहिती न दिल्यास आणि हरवलेल्या चेकचा गैरवापर झाल्यास बँक जबाबदारी स्वीकारण्यास नकार देऊ शकते. अशा वेळी गमावलेली रक्कम परत मिळवणे अत्यंत कठीण होऊ शकते. त्यामुळे आर्थिक सुरक्षिततेसाठी जागरूकता आणि तत्पर कृती हीच सर्वात प्रभावी खबरदारी मानली जाते.
हेही वाचा: Gold SIlver Rate Today: सोनं-चांदी खरेदीचा विचार करताय? पाहा मुंबई, पुण्यासह देशातील प्रमुख शहरांतील सोन्याचे भाव एका क्लिकवर