Friday, July 11, 2025 11:25:10 PM

भारतातील ॲपलच्या कारखान्यातून शेकडो चिनी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; भारत-चीन वादाचा iPhone निर्मितीला फटका?

फॉक्सकॉनने भारतातील आयफोन युनिटमधून 300 चिनी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली असून भारत-चीन तणावामुळे उत्पादन प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारतातील ॲपलच्या कारखान्यातून शेकडो चिनी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी भारत-चीन वादाचा iphone निर्मितीला फटका

India China Tension: आयफोनचे पुढचे मॉडेल ‘आयफोन 17’ चे उत्पादन भारतात होणार असल्याची उत्सुकता वाढलेली असतानाच आता फॉक्सकॉन कंपनीने घेतलेल्या एका निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आयफोनची निर्मिती फॉक्सकॉन कंपनीकडून केली जाते. तमिळनाडू राज्यात फॉक्सकॉनचे आयफोन उत्पादन युनिट आहे. तसेच भारतात आणखी काही कारखाने काढण्याचा मानस फॉक्सकॉन आणि ॲपलकडून व्यक्त करण्यात आला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतरही ॲपल भारतात उत्पादन वाढविण्यावर ठाम होते. मात्र आता फॉक्सकॉनच्या कारखान्यातून शेकडो चिनी कर्मचाऱ्यांची गच्छंती करण्यात आली आहे.

ब्लुमबर्गने दिलेल्या बातमीनुसार, दक्षिण भारतातील फॉक्सकॉनच्या कारखान्यातून जवळपास 300 कुशल चिनी कर्मचाऱ्यांना मागच्या दोन महिन्यात चीनमध्ये परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या भारतातील कारखान्यात तैवानी कर्मचारीच कार्यरत आहेत. दरम्यान फॉक्सकॉन आणि ॲपलने मात्र यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.फॉक्सकॉनचा तैवानी तंत्रज्ञानावर असणार भरब्लुमबर्गच्या माहितीनुसार, चिनी कर्मचारी मायदेशी परतल्यामुळे उत्पादनाचा वेग आणि भारतीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया मंदावणार आहे. मात्र चीनकडून तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञ बाहेरच्या देशात जाऊ नये, असा प्रयत्न होत आहे. काही महिन्यांपूर्वी चीनच्या सरकारने याबद्दल प्रयत्न केले होते.

हेही वाचा: दिशा सालियान प्रकरणात पोलिसांकडून कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर; 'दिशाच्या हत्येशी आदित्य ठाकरेंचा ...

यामुळे मुळची तैवानची कंपनी असलेल्या फॉक्सकॉनने तैवानी तंत्रज्ञान आणि तैवानी अभियंते आणि तंत्रज्ञ यांना भारतात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच भारताली कर्मचाऱ्यांना तैवानी कर्मचारी यापुढे प्रशिक्षण देणार आहेत.चीनचे सरकार यंत्रणांवर दबाव निर्माण करून तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ देशाबाहेर जाऊ देण्यास विरोध करत आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या छुप्या व्यापार युद्धाचा हा परिणाम असून चीनला आपली उत्पादन क्षमता बाहेरील देशात जाऊ द्यायची नाही, असे सांगितले जात आहे. 

एका बाजूला भारत आणि चीन यांच्यात सीमावाद सुरू आहे. तसेच ॲपलने चीनमधील उत्पादन टप्प्याटप्प्याने भारतात हलविण्यास सुरुवात केली. चीनमधील अनेक अभियंते आणि तंत्रज्ञ भारतातील कारखान्यात काम करण्यासाठी आले होते. हे अभियंते आयफोनची निर्मिती करण्यासह भारतीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देत होते. अनेक वर्षांपासून चीनमध्ये होत असलेले उत्पादन भारतात जात असल्यामुळे चीनचा जळफळाट सुरू असल्याचे सांगितले जाते.


सम्बन्धित सामग्री