मुंबई: दिशा सालियन मृत्यूप्रकरणात नवे वळण आले असून, मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत दिशा वर कोणताही लैंगिक अत्याचार झालेला नाही आणि तिचा मृत्यू हत्येमुळे झाल्याचे कोणतेही वैद्यकीय वा वैज्ञानिक पुरावे नसल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रतिज्ञापत्रात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
दिशा सालियन हिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून, तिची हत्या आणि सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. ही याचिका न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सुनावणीस आली होती.
या वेळी मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात घटनास्थळी नेमकं काय घडलं होतं, याची सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. तसेच त्या रात्री दिशासोबत तिचा प्रियकर व मित्र उपस्थित होते आणि त्यांचे जबाब नोंदवले गेले असल्याचेही नमूद आहे.
पोलिसांनी नमूद केल्यानुसार, शवविच्छेदन अहवालात दिशाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून, तिच्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झाल्याचे पुरावे नाहीत. विशेष तपास पथकाने सुद्धा पोलिसांनी केलेल्या तपासाव्यतिरिक्त काहीही सापडले नसल्याचे नमूद केले आहे. तपास अद्याप सुरू असून, याचिका फेटाळण्यायोग्य असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, या प्रकरणात आपली बाजू ऐकून घ्यावी, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी न्यायालयात केली आहे. त्यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करत म्हटले की, आपण या प्रकरणात प्रतिवादी नसूनही राजकीय सूडबुद्धीने आपले नाव गोवले गेले आहे. याचिका खोटी, निराधार आणि द्वेषातून दाखल करण्यात आली असल्याचा दावा ठाकरे यांनी केला.
दिशा सालियन हिचा मृत्यू 2020 मध्ये झाला होता. तो आत्महत्या होता की हत्या, यावर विविध स्तरावर प्रश्न उपस्थित केले जात होते. सोशल मीडियावरूनही यासंदर्भात अनेक तर्कवितर्क मांडले गेले. मात्र, पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे या प्रकरणात अनेक अफवांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, पुढील सुनावणीत या प्रतिज्ञापत्रातील तपशीलांचा विचार करून निर्णय घेण्यात येणार आहे. दिशा सालियन प्रकरणात आता काय वळण येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.