Thursday, July 17, 2025 03:24:13 AM

Cloudburst in Himachal : हिमाचल प्रदेशात ढगफुटीचा कहर: १७ ठिकाणी ढगफुटी, १८ मृत्यू

Cloudburst in Himachal : हिमाचल प्रदेशात ढगफुटीने हाहाकार माजवला आहे. एका रात्रीत १७ ठिकाणी ढगफुटी झाली आहे. यात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३३ जण बेपत्ता आहेत.

cloudburst in himachal  हिमाचल प्रदेशात ढगफुटीचा कहर १७ ठिकाणी ढगफुटी १८ मृत्यू
Cloudburst in Himachal

Cloudburst in Himachal : हिमाचल प्रदेशात सोमवारी रात्री मुसळधार पावसासोबत १७ ठिकाणी ढगफुटीच्या घटनांमुळे संपूर्ण राज्यात हाहाकार माजला आहे. यामध्ये मंडी जिल्ह्यात सर्वाधिक १५ ठिकाणी, तर कुल्लू आणि किन्नौर जिल्ह्यात प्रत्येकी एक ठिकाणी ढगफुटीची नोंद झाली. या भीषण नैसर्गिक आपत्तीत १८ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३३ जण अद्याप बेपत्ता आहेत. प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी तातडीनं मदत आणि बचावकार्य सुरू केलं असून ३३२ जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं आहे.

मंडीच्या या भागात झाली ढगफुटी

करसोगच्या रिक्की, कुट्टी, ओल्ड बाजार, गोहरच्या स्यांज, बाडा, बस्सी, परवाडा, तलवाडा, कैलोधार, धर्मपुरच्या त्रियंबला, भडराना, थुनागच्या कुटाह, लस्सी मोड, रेल चौक, पट्टीकारी या भागात ढगफुटी झाली आहे.

ढगफुटीमुळे मंडी जिल्ह्यातील थुनाग, गोहर, करसोग, धर्मपूर आणि सदर उपमंडलामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यात २४ घरे आणि १२ गोशाळा जमीनदोस्त झाल्या आहेत. तर ३० हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. पटीकरी येथील १६ मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प पुरात वाहून गेला आहे.

हेही वाचा - भारत बनवतोय अमेरिकेपेक्षाही धोकादायक बंकर-बस्टर बॉम्ब; काय आहे खासियत? जाणून घ्या

थुनाग परिसरातील कुकलाह येथे ८ घरे वाहून गेली. त्यामधील २४ जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. गोहर परिसरातील स्यांज भागात दोन घरे वाहून गेली. तर ९ जण पुरात बुडाले आहेत. त्यापैकी दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत. बाडा, परवाडा, करसोग परिसरातही मोठ्या प्रमाणात प्राणहानी आणि घरांचे नुकसान झालं आहे.

NDRF कडून तातडीचा रेस्क्यू

एनडीआरएफच्या पथकांनी टिकरी, रिकी, केलोधार, करसोग, सुजानपूर, धर्मपूर, आणि जोगिंद्रनगर भागात अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचवले. करसोग कॉलेजमधून १२ विद्यार्थ्यांसह ४ महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. राज्यातील ४०६ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या भागातील १ हजार ५१५ वीज ट्रान्सफॉर्मर बंद असल्याने अनेक भाग अंधारात आहेत. हमीरपूर जिल्ह्यातील सुजानपूरमध्ये ५१ जणांना ५ तासांच्या प्रयत्नानंतर वाचवण्यात आलं आहे.

हेही वाचा - हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा कहर! शिमल्यात 5 मजली इमारत पत्त्याच्या घरासारखी कोसळली, पहा व्हिडिओ

मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खूचं आवाहन 

एकाच रात्रीत पावसामुळं झालेल्या घटनामध्ये ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. नागरिकांनी नदी नाल्यांच्या काठावर जाणे टाळावं आणि नदी नाल्यांपासून किमान ५०० मीटर अंतर राखावं, असं आवाहन मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी केलं आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, २० जून ते १ जुलै २०२५ या काळात राज्यात ३५६ कोटी ६७ लाख रुपयांहून अधिक नुकसान झालं आहे.   

हवामान विभागाचा इशारा

हवामान विभागानं पुढील ६ दिवस सतत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यात ४ दिवस ऑरेंज अलर्ट आणि २ दिवस येलो अलर्ट सांगितला आहे. शिमला, सोलन, सिरमौर, मंडी, कुल्लू, आणि कांगडा जिल्ह्यांत पुढील २४ तासांत पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री