Delhi Blast Update: दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. या भीषण स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जखमी झाले आहेत. सध्या तपास यंत्रणा या घटनेचा तपास वेगाने करत असून दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता एनआयएच्या तपासात समोर आलेला एक खुलासा तर थरकाप उडवणारा आहे. या स्फोटाच्या संवादासाठी आरोपींनी ‘कोडवर्ड’चा वापर केला होता.
एनआयएच्या डिजिटल फॉरेन्सिक तपासात उघड झालं आहे की, स्फोटाच्या संपूर्ण योजनेदरम्यान आरोपी चॅटिंग करताना 'दावत' आणि 'बिर्याणी' असे शब्द वापरत होते. या शब्दांचा अर्थ निराळा होता 'दावत' म्हणजे स्फोटाचा प्लॅन आणि 'बिर्याणी' म्हणजे स्फोटकं. या कोडवर्डचा वापर करून आरोपींनी आपली संपूर्ण योजना आखली होती, ज्यामुळे सायबर पोलिसांना त्यांचा मागोवा घेणं अवघड झालं. चॅटमध्ये 'दावत के लिए बिर्याणी तैयार है' असा मेसेज पाठवला गेला होता, ज्याचा अर्थ प्रत्यक्षात “हल्ल्याची तयारी पूर्ण झाली” असा होता.
हा संदेश शाहीन नावाच्या व्यक्तीकडून पाठवण्यात आल्याचं तपासात समोर आलं आहे. एनआयएच्या तपासानुसार, लाल किल्ला स्फोट हा एका संघटित मॉड्यूलचा भाग होता. यामागे काही आंतरराष्ट्रीय कट कारस्थान असल्याचीही शक्यता तपासली जात आहे. आतापर्यंत दिल्ली पोलिस आणि एनआयएने हरियाणा, उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधून अनेक संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
या घटनेनंतर संपूर्ण दिल्लीत सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे. प्रमुख ऐतिहासिक स्थळांवर आणि सार्वजनिक ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात एनआयएला आणखी मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा तपासादरम्यान हरियाणातील फरीदाबाद येथे डॉ. मुझम्मिल शकीलच्या दोन खोल्यांमधून तब्बल 2900 किलो स्फोटकं जप्त करण्यात आली. या स्फोटकांचा वापर लाल किल्ला आणि इतर संवेदनशील भागांमध्ये करण्याची योजना होती.
मुझम्मिल आणि त्याचा साथीदार डॉ. उमर यांनी लाल किल्ल्याची आधीच रेकी केल्याचं तपासात समोर आलं आहे. दोघांनी 26 जानेवारी आणि दिवाळीच्या काळात हल्ला करण्याची योजना आखली होती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकली असती. या योजनेत सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्यासाठी एनआयए आता सायबर नेटवर्क आणि विदेशी संपर्कांचा तपास करत आहे.
या प्रकरणाने पुन्हा एकदा देशाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. हल्ल्याची पद्धत, कोडवर्डचा वापर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेला संवाद यामुळे सायबर सिक्युरिटी तज्ञ आणि गुप्तचर यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
सध्या एनआयए आरोपींच्या मोबाईल, लॅपटॉप आणि चॅट हिस्ट्रीची सखोल तपासणी करत आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, हा स्फोट फक्त एक अपघात नव्हता, तर देशाच्या सुरक्षेला डळमळीत करण्याचा एक ठरविक प्रयत्न होता.