Air India Express Bomb Threat: मुंबईहून वाराणसीकडे जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात बुधवारी प्रवासादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. उड्डाण सुरू असतानाच विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. तात्काळ आपत्कालीन पावले उचलत, विमानाचे लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमान उतरताच ते आयसोलेशन बेमध्ये हलवण्यात आले. तसेच सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. बॉम्ब शोध आणि निष्क्रियकरण पथक (Bomb Disposal Squad) ने विमानाची तपासणी सुरू केली असून, सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
हेही वाचा - Bomb Threat In Mahanagari Express: 'पाकिस्तान जिंदाबाद, ISI...'; दिल्ली स्फोटानंतर महानगरी एक्सप्रेसमध्ये आढळला धमकीचा संदेश
एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, “वाराणसीला जाणाऱ्या आमच्या विमानाला सुरक्षा धोक्याची सूचना मिळाल्यानंतर सर्व आवश्यक प्रोटोकॉल तत्काळ लागू करण्यात आले. विमान सुरक्षितपणे उतरले असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर विमान पुन्हा सेवेत आणले जाईल.”
हेही वाचा - Delhi Blast Update: दिल्ली बॉम्बस्फोट तपासात मोठा ट्विस्ट; संशयित एक नव्हे तर दोन कारमध्ये आले होते
दरम्यान, यापूर्वीच बुधवारी इंडिगो एअरलाइन्सलाही बॉम्ब धमकीचा ईमेल प्राप्त झाला होता. त्यानंतर मुंबई, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद आणि तिरुअनंतपुरम या प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र चौकशीत ती धमकी खोटी असल्याचे स्पष्ट झाले. सध्या तपास यंत्रणा या नव्या धमकीच्या स्रोताचा शोध घेत आहेत. तसेच विमानतळांवर सुरक्षेची पातळी वाढवण्यात आली आहे.