Road Accidents In India: द्रमुक खासदार ए. राजा यांनी भारतातील वाढत्या रस्ते अपघातांकडे लोकसभेचे लक्ष वेधत गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांच्या प्रश्नानंतर रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील अपघाती मृत्यूंचा धक्कादायक आकडा सभागृहात मांडला. 2024 मधील रस्ते अपघातांचे भीषण चित्र उघड करत गडकरी यांनी एकाच वर्षात 1.77 लाख मृत्यू झाल्याची माहिती दिली. ए. राजा यांच्या उपस्थित प्रश्नामुळे देशातील रस्ते सुरक्षिततेबाबतचा मोठा खुलासा झाला आहे.
दरम्यान, 2023 मधील 1.73 लाख मृत्यूंच्या तुलनेत यंदाचा आकडा आणखी मोठा असून, रस्ते अपघाती मृत्यूंचा हा देशातील आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा ठरला आहे. गडकरी यांनी स्पष्ट केले की रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी तातडीने अधिक कडक पावले उचलण्याची गरज आहे. पश्चिम बंगालचा डेटा eDAR पोर्टलवरून घेण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
दररोज 485 लोकांचा अपघातात मृत्यू
केंद्राकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात दररोज सरासरी 485 लोक रस्ते अपघातांत प्राण गमावत आहेत. त्यापैकी 31 टक्के मृत्यू राष्ट्रीय महामार्गांवर झाले असून, 2024 मध्ये एकूण 54,433 मृत्यू महामार्गांवर नोंदवले गेले. रस्ते अपघात भारतीय वाहतूक व्यवस्थेसमोरील एक गंभीर संकट बनले असून, वाढत्या मृत्यूदरामुळे सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
हेही वाचा - HC On Alimony: पत्नीच्या व्यभिचाराबाबत कोर्टाचा मोठा निर्णय; पोटगी देण्यास पतीला दिली सूट
चीन आणि अमेरिकेसोबत तुलना : भारत किती मागे?
केंद्राच्या अहवालानुसार, भारताचा रस्ते अपघाती मृत्युदर प्रति लाख लोकसंख्येमागे 11.89 असा आहे. तर चीनमध्ये हे प्रमाण 4.3 असे आहे. जो भारतापेक्षा खूपच कमी आहे. तथापी, अमेरिकेत हे प्रमाण 12.76 असे आहे. अमेरिकेपेक्षा भारताचा मृत्युदर थोडा कमी असला, तरी चीनच्या तुलनेत तो जवळजवळ तीनपट जास्त आहे.
हेही वाचा - Bomb Threat in Indigo Flight : इंडिगोच्या विमानात 'बॉम्ब'ची धमकी; कुवेतऐवजी मदिना-हैदराबाद विमानाचे अहमदाबादेत इमर्जन्सी लँडिंग
भारताने स्टॉकहोम घोषणापत्रावर स्वाक्षरी करून 2030 पर्यंत रस्ते अपघाती मृत्यूंमध्ये 50 टक्के घट करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र India Status Report on Road Safety 2024 मध्ये स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की सध्याच्या ट्रेंडनुसार हे लक्ष्य साध्य करणे जवळपास अशक्य दिसते. देशात वाढत्या वाहनसंख्या, रस्त्यांची गुणवत्ता, वाहतूक नियमांचे पालन, तसेच आपत्कालीन आरोग्यसेवा यांसारख्या अनेक घटकांवर तातडीने सुधारणा गरजेची असल्याचे तज्ज्ञांनीही नमूद केले आहे.