Surgical Scissors Left in Stomach: केरळमधील अल्लापुझा येथे वैद्यकीय निष्काळजीपणाचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेच्या पोटाच्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी चुकून शस्त्रक्रियेची कात्री (Surgical Scissors) पोटातच सोडली. विशेष म्हणजे, ही महिला गेल्या 5 वर्षांपासून सतत होणाऱ्या पोटदुखीने त्रस्त होती, मात्र हे भयानक सत्य नुकत्याच झालेल्या एका स्कॅनमुळे समोर आले आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
पाच वर्षांचा असह्य वेदनांचा प्रवास
अल्लापुझा येथील पुन्नाप्रा येथील रहिवासी असलेल्या उषा जोसेफ यांच्यावर 5 वर्षांपूर्वी वंदनम सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांतच त्यांना अधूनमधून तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. गेल्या 5 वर्षांपासून त्यांनी अनेक रुग्णालयांत चकरा मारल्या, औषधोपचार केले, परंतु त्यांच्या वेदनांचे नेमके कारण कोणालाही शोधता आले नाही. या काळात त्यांना शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही त्रासाला सामोरे जावे लागले.
एमआरआय स्कॅन आणि धक्कादायक वास्तव
उषा जोसेफ यांना जेव्हा उपचारांसाठी कोची येथील अमृता रुग्णालयात नेण्यात आले, तेव्हा तिथे करण्यात आलेल्या एमआरआय (MRI) स्कॅनमध्ये त्यांच्या पोटात धातूची कात्री असल्याचे स्पष्ट झाले. धक्कादायक बाब म्हणजे, यापूर्वी वंदनम मेडिकल कॉलेजमध्ये तपासणी केली असता, तिथल्या प्रशासनाने पोटात कात्री असल्याचे नाकारले होते आणि त्यांना केवळ किडनी स्टोन (Kidney Stone) असल्याचे सांगून परत पाठवले होते. मात्र, नवीन स्कॅन रिपोर्टने हॉस्पिटलचा खोटेपणा आणि डॉक्टरांचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आणला आहे.
हेही वाचा - Priyanka Chopra : 'मी फक्त 11 वर्षांची होते आणि कॅबमध्ये..., तेव्हा माझ्या आईची दुसरी बाजू पाहिली'; 'दि ब्लफ'च्या प्रमोशनवेळी प्रियांका चोप्रानं सांगितला थरारक अनुभव
आरोग्य मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
या घटनेची माहिती मिळताच केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या प्रकरणाला 'गंभीर निष्काळजीपणा' असे संबोधले असून, वंदनम सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक टीम चौकशीसाठी पाठवली आहे. दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.
न्यायासाठी कुटुंबाचा टाहो
"आम्ही गेल्या 5 वर्षांपासून नरकयातना भोगत आहोत. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या एका चुकीमुळे माझ्या जिवावर बेतले होते," अशा भावना पीडित उषा जोसेफ यांनी व्यक्त केल्या आहेत. सध्या त्यांचे कुटुंब या प्रकरणी संबंधित डॉक्टरांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आणि नुकसानभरपाई मिळवून देण्याची मागणी करत आहे. या घटनेमुळे सरकारी रुग्णालयांच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.