ऐन दिवाळीच्या आनंदात विघ्न आणण्यासाठी हवामान बदलाचे संकट उभे ठाकले असून, बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळाची निर्मिती आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील हवामान ढवळून निघाले आहे. बाजारपेठांमध्ये रोषणाई आणि खरेदीची धामधूम सुरू असतानाच हवामान विभागाने वर्तवलेल्या या नव्या इशाऱ्याने नागरिकांच्या चिंतेत भर घातली आहे. या दुहेरी वादळी प्रणालीचा फटका महाराष्ट्रासह दक्षिण आणि पूर्व किनारपट्टीवरील राज्यांना बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रातील वातावरणात बदल होण्याची शक्यता
आगामी 23 ते 29 ऑक्टोबरदरम्यान देशाच्या हवामानात मोठे फेरबदल पाहायला मिळणार आहेत. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही बाजूंनी बाष्पयुक्त वारे जोरदारपणे सक्रिय झाले आहेत. यामुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील काही भागांतही हवामानात मोठा उलटफेर होऊ शकतो. विशेष करून कोकण, दक्षिण महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांना आणि ऐन सणासुदीच्या काळात शेतात काढणीला आलेली पिके वाचवण्यासाठी धावपळ करणाऱ्या शेतकऱ्यांना या अनपेक्षित हवामान बदलाचा मोठा त्रास सहन करावा लागण्याची भीती निर्माण झाली आहे.
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा जोर वाढणार
हवामान खात्याच्या अहवालानुसार, बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली ही वादळी प्रणाली पश्चिमेकडे सरकत असताना अधिकच तीव्र आणि रौद्ररूप धारण करणार आहे. येत्या 27 आणि 28 ऑक्टोबरदरम्यान ओडिशा तसेच आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात काही ठिकाणी 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, असा अंदाज आहे. येत्या 29 ऑक्टोबरपर्यंत या भागात अतिवृष्टीचा जोर कायम राहील. समुद्रात उसळणाऱ्या प्रचंड लाटा आणि सोसाट्याचा वारा यामुळे मच्छिमारांनी खोल समुद्रात अजिबात जाऊ नये, असे सक्त निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
हेही वाचा – ऑक्टोबर संपत आला, तरी थंडी गायब! महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला, मुंबईसह ‘या’ शहरांत पारा 35 अंशाच्या पार
अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा
दुसऱ्या बाजूला, आग्नेय अरबी समुद्र आणि लक्षद्वीप परिसरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये पावसाने आधीच थैमान घातले आहे. पुद्दुचेरी आणि कराईकल परिसरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून प्रशासनाने या भागातील सर्व शाळांना तात्काळ सुट्टी जाहीर केली आहे. तसेच कर्नाटक आणि तेलंगणामध्येही आगामी 29 ऑक्टोबरपर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.