Bharat Taxi: केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सोमवारी दिल्ली-NCR आणि गुजरातमधील कॅब व ऑटो चालकांशी संवाद साधताना एका क्रांतिकारी योजनेची घोषणा केली. 'भारत टॅक्सी' या सहकारी टॅक्सी सेवेच्या माध्यमातून आता टॅक्सी चालक केवळ कामगार न राहता व्यवसायाचे सह-मालक बनू शकणार आहेत. यासाठी चालकांना केवळ 500 रुपयांची प्राथमिक गुंतवणूक करावी लागणार असून, या मॉडेलमुळे वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्याचा विश्वास शाह यांनी व्यक्त केला आहे.
अमूल मॉडेलवर आधारित नफा विभागणी
अमित शाह यांनी या योजनेची तुलना जगप्रसिद्ध 'अमूल' डेअरी मॉडेलशी केली. ते म्हणाले, "खाजगी कंपन्यांमध्ये 100 रुपये नफा झाला तर 85 रुपये मालकाला मिळतात. मात्र, अमूलमध्ये 85 टक्के नफा थेट दूध उत्पादकांना परत दिला जातो. भारत टॅक्सीमध्येही हेच तंत्र वापरले जाईल." योजनेनुसार, भारत टॅक्सीच्या एकूण उत्पन्नातील 20 टक्के रक्कम भांडवल म्हणून जमा केली जाईल, तर उर्वरित 80 टक्के रक्कम चालकांनी केलेल्या कामाच्या आधारावर थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाईल.
किमान उत्पन्न आणि नफ्यातील हिस्सा निश्चित
भारत टॅक्सी प्लॅटफॉर्मशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक ड्रायव्हरला प्रति किलोमीटर एक किमान मूळ भाडे सुनिश्चित केले जाईल. अमित शाह यांनी स्पष्ट केले की, "तुम्हाला निश्चित भाडे तर मिळेलच, पण तुम्ही मालक असल्याने नफ्यातही तुमचा वाटा असेल. मात्र, हा मोठा फायदा मिळवण्यासाठी पहिल्या 3 वर्षांचा संयम राखणे आवश्यक आहे." या योजनेमुळे ड्रायव्हर्सना शोषणमुक्त व्यापार करण्याची संधी मिळणार आहे.
हेही वाचा -Indian Army Prahaar Policy: स्थानिक पोलीस ते विशेष दले; दहशतवादाविरोधात एकसंध फळी, दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी 'प्रहार' नियमावली सज्ज
लोकशाही पद्धतीने चालणार कारभार
या सहकारी संस्थेचे भविष्य ड्रायव्हर्सच्या हातात असेल. शाह यांनी सांगितले की, केवळ 500 रुपयांचा शेअर खरेदी करून चालक सह-मालक बनतील. जसजशी सदस्यांची संख्या वाढेल, तसतसे संस्थेच्या 'संचालक मंडळावर' (Board of Directors) चालकांसाठी जागा राखीव ठेवल्या जातील. ज्याप्रमाणे 36 लाख महिलांनी 50-50 रुपये गुंतवून अमूलला 1,25,000 कोटींच्या उलाढालीवर नेले, तसेच भारत टॅक्सीचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.