दिल्लीच्या द्वारका परिसरातील भीषण अपघातात 23 वर्षीय साहिल धनशेरा याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची आई इन्ना माकन यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. “हा अपघात नाही, ही गुन्हेगारी कृती आहे,” असे ठाम शब्दांत त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, एसयूव्ही चालवणारा अल्पवयीन चालक आणि त्याचे कुटुंब यांना जबाबदार धरलेच पाहिजे.
इन्ना माकन यांनी सांगितले की, 3 फेब्रुवारी रोजी साहिल कामावर जात असताना स्कॉर्पिओ कार वेगाने आणि विरुद्ध दिशेने चालवत स्टंट करत होती. “तो आणि त्याची बहीण ‘फन रील’ बनवत होते. गाडीचा वेग व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतो. माझा मुलगा उजवीकडे पाहत होता, कारण बसच्या डावीकडे ई-रिक्षा होती. त्याच क्षणी स्कॉर्पिओने त्याच्या दुचाकीला धडक दिली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारवर आदळली. धडक दिल्यानंतरही ब्रेक लावले नाहीत,” असा आरोप त्यांनी केला. या अपघातात एका टॅक्सीचालकालाही गंभीर दुखापत झाली.
“काही लोकांना वाटते की, त्यांच्या पालकांकडे पैसा आहे म्हणून ते रस्त्यावर काहीही करू शकतात. ही गुन्हेगारी मानसिकता आहे. माझ्या मुलाचा जीव त्यांच्या ‘रील’मुळे गेला,” असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. आरोपी चालकाविरुद्ध आधीच वेगमर्यादा भंगाचे अनेक दंड (चलान) असल्याचा दावा करत, त्याच्या वडिलांनी त्याला वाहन चालवण्यापासून का रोखले नाही?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा: India Seizes Oil Tankers: इराणशी संबंधित तीन तेलवाहू जहाजे भारताच्या ताब्यात; देशाच्या समुद्री हद्दीमध्ये भारतीय नौदलाची मोठी कारवाई
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना द्वारका साऊथ येथे घडली. सकाळी सुमारे 11 वाजून 57 मिनिटांनी पीसीआर कॉल आल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना तीन नुकसानग्रस्त वाहने आणि एक दुचाकी आढळली. साहिलला जागीच मृत घोषित करण्यात आले, तर जखमी टॅक्सीचालकाला आयजीआय रुग्णालयात हलवण्यात आले.
अल्पवयीन आरोपीकडे वाहनचालक परवाना नव्हता. त्याला ताब्यात घेऊन किशोर न्याय मंडळासमोर (Juvenile Justice Board) हजर करण्यात आले. 10 फेब्रुवारी 2026 रोजी त्याला दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या कारणास्तव अंतरिम जामीन देण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.
“ही चूक नव्हे, हा जाणीवपूर्वक केलेला स्टंट होता,” असे सांगत इन्ना माकन यांनी पुन्हा एकदा न्यायाची मागणी केली. जर अशा बेफिकीर वृत्तीला आळा घातला नाही, तर “रस्त्यावर कोणीही सुरक्षित नाही, ”असे मत मांडत त्यांनी कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
हेही वाचा: Ajit Pawar Statue : अजित पवार यांना आदरांजली, बारामतीत उभारणार 10 फुट उंचीचा पुतळा; व्हिडीओ समोर