पश्चिम बंगाल: भारताच्या राजकीय नकाशावरील पाच महत्त्वाच्या राज्यांच्या भविष्याचा फैसला आज, 4 मे 2026 रोजी होणार आहे. एप्रिल महिन्यात पार पडलेल्या धडाकेबाज प्रचारसभा आणि विक्रमी मतदानानंतर, आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून काही तासांतच सत्तेची चावी कुणाकडे जाणार याचे चित्र स्पष्ट होईल. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी या राज्यांमध्ये झालेल्या मतदानाची मोजणी करण्यासाठी निवडणूक आयोगाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. सुरुवातीला टपाली मतपत्रिकांची (Postal Ballots) मोजणी होईल आणि त्यानंतर सकाळी 8:30 च्या सुमारास ईव्हीएममधील (EVM) मतांचा कौल समोर येईल.
यंदाच्या निवडणुकीत पश्चिम बंगालकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. बंगालमधील 294 पैकी 293 जागांचे निकाल आज जाहीर होतील. फाल्टा विधानसभा मतदारसंघात काही तांत्रिक कारणांमुळे निवडणूक आयोगाने पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतल्याने, त्या एका जागेचा निकाल 24 मे रोजी जाहीर होईल. बंगालमध्ये सत्ता स्थापनेसाठी 148 हा बहुमताचा आकडा गाठणे आवश्यक आहे. येथे ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात 'काटे की टक्कर' पाहायला मिळत आहे. बंगालमध्ये यंदा तब्बल 92.47 टक्के इतके विक्रमी मतदान नोंदवले गेले असून, हा वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
हेही वाचा: West Bengal Election 2026: ‘बॅटल फॉर बंगाल’चा 'सिक्रेट' रिपोर्ट लीक! निकालात मोठा ट्विस्ट; एक्झिट पोलचे आकडे पाहून बड्या नेत्यांनाही टेंशन
दक्षिण भारतासह ईशान्येकडील राज्यांमध्येही सत्तेचा पेच सुटणार आहे. तामिळनाडूमध्ये 234 जागांसाठी मतदान झाले असून, तिथे बहुमतासाठी 118 जागांची गरज आहे. केरळच्या 140 जागांवर डावी आघाडी (LDF) आणि काँग्रेसप्रणीत (UDF) यांच्यात जोरदार संघर्ष आहे. आसाममध्ये भाजप विजयाची हॅट्ट्रिक साधणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल, तर पुदुचेरीच्या 30 जागांवरही स्थानिक समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी लक्षणीय राहिली असून, मतदारांनी दिलेला कौल आज राजकारणाची नवी दिशा निश्चित करेल.
सुरक्षेच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. पश्चिम बंगालमधील सर्व मतमोजणी केंद्रांना 'हाय-सिक्युरिटी झोन'मध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आल्या आहेत. मतमोजणी केंद्राच्या आवारात केवळ अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश दिला जात असून, प्रत्येक फेरीनंतर निकालाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. सोशल मीडियावरील अफवांना लगाम लावण्यासाठीही सायबर सेल सज्ज आहे.
कुठे पाहाल निकालाचे लाईव्ह अपडेट्स?
जर तुम्हाला या पाचही राज्यांचे निकाल सर्वात आधी आणि अधिकृतरीत्या पाहायचे असतील, तर निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईट results.eci.gov.in येथे भेट देऊ शकता. तसेच voters.eci.gov.in या पोर्टलवरही मतदारसंघनिहाय कल आणि उमेदवारांची आघाडी/पिछाडी पाहता येईल. याशिवाय आमच्या जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या https://www.jaimaharashtranews.com/ या वेबसाइटवरही निकालाचे अपडेट्स पाहायला मिळतील. निवडणूक आयोगाचे 'Voter Helpline App' मोबाईलवर डाऊनलोड करून तुम्ही घरबसल्या रिअल-टाइम निकाल पाहू शकता. आज दिवसभर चालणाऱ्या या मतमोजणी प्रक्रियेतून भारतीय लोकशाहीचा पुढचा अध्याय लिहिला जाणार आहे.
हेही वाचा: Baramati-Rahuri ByElection Result: बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची मतमोजणी, कोण मारणार बाजी?