दरभंगा (बिहार) : बिहारमध्ये होणाऱ्या 2025 विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दरभंग्यात झालेल्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महागठबंधनावर जोरदार टीका केली. भाजप उमेदवार मैथिली ठाकूर यांना पाठिंबा देण्याचे आवाहन करताना शाह यांनी विरोधकांवर वंशवादाच्या राजकारणाचा आरोप केला.
शाह म्हणाले, “भाजपने 25 वर्षीय मैथिली ठाकूर यांना तिकीट दिले ज्यांचा कोणताही राजकीय वारसा नाही. RJD किंवा काँग्रेसमध्ये अशी गोष्ट शक्य आहे का? लालू प्रसाद यादव आपल्या मुलाला बिहारचा मुख्यमंत्री बनवू इच्छितात आणि सोनिया गांधी आपल्या मुलाला पंतप्रधान बनवू पाहत आहेत. पण ही कोणतीही जागा रिक्त नाही.” अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.
यावेळी त्यांनी दरभंग्यासाठी अनेक विकास प्रकल्पांची घोषणा केली. “दरभंग्यात विमानतळ बांधकाम पूर्ण झाले असून AIIMS उभारणी सुरू आहे. आता येथे लवकरच मेट्रो रेलसेवाही मिळणार आहे,” असे शाह म्हणाले. त्यांनी पुढे म्हटले की केंद्र सरकारने मैथिली भाषेला अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आणि भारतीय राज्यघटनेचा अनुवादही मैथिली भाषेत करण्यात आला.
हेही वाचा: PM Modi in Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये देशवासियांना देणार महत्त्वाचा संदेश
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या भूमिका अधोरेखित करत शाह म्हणाले की, पूर्वी दहशतवादामुळे देश रक्तबंबाळ होत असे. पण पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला धडा शिकवण्यात आला. त्यांनी हेही स्पष्ट केले की कट्टरपंथी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front of India, PFI) संघटनेवर बंदी घालण्यात आली असून त्यांच्या सदस्यांना तुरुंगाबाहेर येऊ दिले जाणार नाही. “जर तुम्ही लालू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पुन्हा सत्ता दिली, तर PFI सदस्य तुरुंगातून बाहेर पडतील,” असा इशाराही त्यांनी मतदारांना दिला.
धार्मिक आणि सांस्कृतिक भावनेला स्पर्श करत शाह म्हणाले की, माते सीतेच्या जीवनाशी निगडित स्थळांना एकत्र जोडून राम सर्किट विकसित केले जाईल. “राम मंदिर वर्षानुवर्षे रोखण्यात आले. पण मोदी सरकारने अयोध्येत भव्य राम मंदिर उभारले. आता मिथिलेत माता सीता मंदिर उभारण्याची वेळ आली आहे,” असे ते म्हणाले.
अमित शाह यांच्या या दौऱ्यामुळे बिहारमधील निवडणूक वातावरण अधिक तापले असून महागठबंधन आणि सत्ताधारी NDA यांच्यातील राजकीय लढाई अधिक तीव्र होईल, अशी चिन्हे दिसत आहेत.
हेही वाचा: Asaram Bapu Bail: राजस्थान उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! आसारामला सहा महिन्यांचा वैद्यकीय जामीन मंजूर