बेंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने आयपीएल 2025 चे विजेतेपद जिंकल्यानंतर बुधवारी विजय साजरा करण्यासाठी बेंगळुरूमध्ये एक उत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान, चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाले. आता या प्रकरणात RCB फ्रँचायझीसह अनेकांच्या अडचणी वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरू पोलिसांनी RCB फ्रँचायझी, DNA एंटरटेनमेंट, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन आणि इतरांविरुद्ध FIR दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, बेंगळुरूमधील चेंगराचेंगरी प्रकरणात RCB, DNA (इव्हेंट मॅनेजर), KSCA प्रशासकीय समिती आणि इतरांविरुद्ध क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आला आहे. या FIR मध्ये, चेंगराचेंगरीच्या घटनेत गुन्हेगारी निष्काळजीपणाचा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या FIR मध्ये कलम 105, 125 (1)(2), 132, 121/1, 190 आर/डब्ल्यू 3 (5) लावण्यात आले आहेत.
हेही वाचा - 'महाकुंभातही 50-60 जणांचा मृत्यू झाला होता'; बेंगळुरूमधील चेंगराचेंगरीच्या घटनेवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची प्रतिक्रिया
उच्च न्यायालयाने घेतली दखल -
दरम्यान, बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीची कर्नाटक उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. न्यायालयाने कर्नाटक सरकारला अनेक कठीण प्रश्न विचारले आहेत. न्यायालयाने सरकारला विचारले की, जर भविष्यात अशी घटना घडली तर तुमच्याकडे निश्चित योजना (SOP) आहे का? यावर राज्य सरकारच्या वतीने उपस्थित असलेले महाधिवक्ता म्हणाले की, सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून भविष्यात यावर योजना तयार करण्यात येतील. तथापि, कर्नाटक उच्च न्यायालयाने चेंगराचेंगरीच्या घटनेचा स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जून रोजी होणार आहे.
हेही वाचा - आता IPL विजेत्या संघाला मर्यादेत आनंद साजरा करावा लागणार; BCCI आणणार नवीन पॉलिसी
मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर -
आरसीबीने बेंगळुरूमधील चेंगराचेंगरीबद्दल दुःख व्यक्त केले आहे. आरसीबीने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. यासोबतच, अपघातात जखमी झालेल्यांना मदत करण्यासाठी आरसीबी केअर्स फंड तयार करण्याची चर्चा देखील झाली आहे.