मुंबई : दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात हवेतच धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. FZ-1073 या विमानाच्या कॉकपिटमध्ये सहवैमानिकाने भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेनंतर विमानात मोठा गोंधळ निर्माण झाला. मात्र, जखमी अवस्थेतही कॅप्टनने विमानावरील नियंत्रण कायम ठेवत परिस्थिती हाताळल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फ्लायदुबईचे FZ-1073 विमान दुबईहून तेल अवीवच्या दिशेने रवाना झाले होते. विमान हवेत असताना कॉकपिटमध्ये वैमानिकांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर सहवैमानिकाने कॅप्टनवर चाकूने हल्ला केल्याचा दावा आहे. या हल्ल्यात कॅप्टन जखमी झाले.
घटनेनंतर विमानाने आपत्कालीन परिस्थितीचे संकेत पाठवले. विमानाने काही वेळातच मोठ्या प्रमाणात उंची कमी केली. विमानातून आपत्कालीन तसेच अपहरणासंदर्भातील अलर्ट पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे विमानाच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली.
हेही वाचा: पंतप्रधान मोदी अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा; कोणत्या विषयावर झालं खलबतं?
परिस्थिती गंभीर होत असताना काही प्रवाशांनी कॉकपिटकडे धाव घेत हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे कॉकपिटमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात मदत झाली. विमानात 27 मुलांसह 174 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, विमानाला इस्रायलऐवजी सौदी अरेबियातील ताबुक विमानतळाकडे वळवण्यात आले. तिथे विमानाचे सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमान ताबुक विमानतळावर पोहोचल्यानंतर जखमी कॅप्टन आणि सहवैमानिकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांवर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर सौदी अधिकाऱ्यांनी संबंधित सहवैमानिकाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्याची चौकशी सुरू असून, हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, याचा तपास केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच इस्रायलमध्येही सुरक्षेच्या दृष्टीने हालचाली वाढल्या. इस्रायली हवाई दलाची लढाऊ विमाने सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली. मात्र, विमानातील नेमका प्रकार आणि त्यामागील हेतू तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे या घटनेची विशेष चर्चा होत आहे. हजारो फूट उंचीवर विमान असताना निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीत विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे. सध्या संबंधित यंत्रणांकडून संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे.