प्रयागराज : ओव्हरब्रिजवर सेल्फी घेत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने एका एसयूव्हीला (SUV) धडक दिली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. सोमवारी सकाळी ही घटना घडली. वाराणसीमधील शिवपुरी येथील रहिवासी असलेल्या मित्रांचा हा गट मिर्झापूरमधील विंध्याचल मंदिरावरून परतत होता. प्रयागराज-वाराणसी महामार्गावर रूपापूरजवळ ओव्हरब्रिजवर त्यांनी आपली ‘स्कॉर्पिओ’ गाडी थांबवून सेल्फी घेण्यास सुरुवात केली होती, असे पोलिसांनी सांगितले.
प्रयागराजच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने एसयूव्हीला मागून धडक दिली आणि जवळ उभ्या असलेल्या तरुणांना चिरडले, असे सांगण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. वाहनात अडकलेल्यांना गॅस कटरच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांची ओळख अमन यादव, गोलू यादव आणि आलोक मिश्रा अशी पटली आहे. चौथ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. जखमींपैकी कन्हैया यादव आणि निखिल कुमार यांची प्रकृती गंभीर आहे. तिसऱ्या जखमी व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगण्यात आले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.