मुंबई: देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याने पुन्हा एकदा जोरदार उसळी घेतली आहे. 24 जानेवारीच्या सकाळी सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ नोंदवली गेली असून, राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव थेट 157310 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याने नवा विक्रम प्रस्थापित करत हाजिर भाव 4967.41 डॉलर प्रति औंस या उच्चांकावर गेला आहे.
जागतिक स्तरावर सुरू असलेले राजकीय तणाव, अमेरिकन डॉलरमधील कमजोरी आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वाढलेला ओढा यामुळे सोन्याच्या किमतींना आधार मिळत आहे. गुंतवणूकदारांकडून सातत्याने होत असलेली खरेदी आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता यामुळे सोन्याचा दर आणखी मजबूत झाल्याचे बाजार तज्ज्ञांचे मत आहे.
देशातील प्रमुख शहरांमध्येही आज सोन्याचे दर उच्च पातळीवर स्थिरावले आहेत. दिल्लीत 22 कॅरेट सोने 144210 रुपये तर 24 कॅरेट सोने 157310 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने उपलब्ध आहे. मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद येथे 22 कॅरेट सोन्याचा भाव 144060 रुपये असून 24 कॅरेटचा दर 157160 रुपये आहे. अहमदाबाद आणि भोपाळमध्ये 22 कॅरेट सोने 144110 रुपये, तर 24 कॅरेट सोने 157210 रुपये दराने विकले जात आहे.
हेही वाचा: Freestyle Fighting Video Viral : मसाजसाठी घरी आलेल्या थेरपिस्टची महिलेसोबत फ्री-स्टाईल हाणामारी; दोघींची तू-तू...मैं-मैं कॅमेऱ्यात कैद
जयपूर, लखनऊ आणि चंदीगड येथेही दिल्लीसारखेच दर पाहायला मिळत असून, या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 144210 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 157310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. देशभरातील बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये जवळपास समानता दिसून येत असली तरी मागणी अधिक असल्यामुळे दर उच्चांकाजवळच टिकून आहेत.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज संस्था गोल्डमॅन सॅक्सने सोन्याबाबतचा दीर्घकालीन अंदाज आणखी वाढवला आहे. डिसेंबर 2026 साठी सोन्याच्या किमतीचा अंदाज 4900 डॉलर प्रति औंसवरून थेट 5400 डॉलर प्रति औंसपर्यंत नेण्यात आला आहे. जागतिक धोरणात्मक जोखमींपासून बचावासाठी खासगी क्षेत्रातील गुंतवणूकदार सोने दीर्घकाळ विकणार नाहीत, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.
चांदीच्या बाजारातही आज तेजी कायम आहे. 24 जानेवारीच्या सकाळी देशांतर्गत बाजारात चांदीचा दर वाढून 340100 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा हाजिर भाव 99.46 डॉलर प्रति औंसपर्यंत वाढला आहे. तज्ज्ञांच्या मते, देशांतर्गत मागणी, औद्योगिक वापर आणि जागतिक आर्थिक घडामोडी यांचा एकत्रित परिणाम सोने आणि चांदीच्या किमतींवर पुढील काळातही दिसून येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: KRK In Firing Case : त्या गोळीबारप्रकरणात केआरकेचा हात; मुंबई पोलिसांनी केली केआरकेला अटक