Thursday, February 12, 2026 06:29:54 PM

Gold Silver Rate Today: बायको खुश, खिसाही खुश; सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोने खरेदीची वेळ आली का?

देशातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याच्या दरात काही अंशी घसरण पाहायला मिळाली आहे.

gold silver rate today बायको खुश खिसाही खुश सोन्याच्या दरात मोठी घसरण सोने खरेदीची वेळ आली का

मुंबई: देशांतर्गत सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली सोन्याची जोरदार उसळी अखेर थांबली आहे. सुरक्षित गुंतवणूक (सेफ एसेट) म्हणून असलेली मागणी कमी होणे आणि विक्रमी पातळी गाठल्यानंतर गुंतवणूकदारांनी केलेली नफावसूली, यामुळे सोन्याच्या दरात नरमाई आली आहे. 23 जानेवारीच्या सकाळी राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर घसरून 154450 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला, तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 4822.65 डॉलर प्रति औंसपर्यंत घसरले.

जागतिक पातळीवर राजकीय घडामोडींनीही सोन्याच्या किमतींवर परिणाम केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडच्या मुद्द्यावर युरोपमधील काही देशांवर प्रस्तावित टॅरिफ लावण्याची योजना रद्द केल्याची घोषणा केली. तसेच ग्रीनलँड आणि संपूर्ण आर्क्टिक क्षेत्राबाबत भविष्यातील सहकार्याचा एक फ्रेमवर्क तयार करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महत्त्वाचे म्हणजे, ग्रीनलँडवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेकडून लष्करी बळाचा वापर केला जाणार नाही, असेही ट्रम्प यांनी सांगितले.

या घोषणांमुळे राजकीय तणावात घट झाली असून त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर दिसून आला. यापूर्वी ट्रम्प यांनी डेनमार्क, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, जर्मनी, युनायटेड किंगडम, नेदरलँड्स आणि फिनलँड या देशांकडून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर 10 टक्के टॅरिफ लावण्याचा इशारा दिला होता. ही टॅरिफ योजना आता मागे घेण्यात आल्याने सराफ बाजारातील अनिश्चितता काही प्रमाणात कमी झाली आहे.

हेही वाचा: Raj Thackeray Article : 'माझा काका...माझं बालपण, तो माझ्यासाठी नेहमी पहाडासारखा उभा राहिला...'; राज ठाकरेंचा तब्बल 20 वर्षांनंतर सामनामध्ये लेख

देशातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याच्या दरात काही अंशी घसरण पाहायला मिळाली आहे. दिल्लीत आणि जयपूरमध्ये 22 कॅरेट सोने 141590 रुपये तर 24 कॅरेट सोने 154450 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने उपलब्ध आहे. मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद येथे 22 कॅरेट सोन्याचा भाव 141440 रुपये, तर 24 कॅरेटचा भाव 154300 रुपये आहे. अहमदाबाद आणि भोपाळमध्ये हे दर अनुक्रमे 141490 आणि 154350 रुपये असून, लखनऊ आणि चंदीगडमध्ये दिल्लीसारखेच दर नोंदवले गेले आहेत.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज संस्था Goldman Sachs यांनी सोन्याबाबतचा दीर्घकालीन अंदाज अधिक सकारात्मक केला आहे. डिसेंबर 2026 साठी त्यांनी सोन्याच्या किमतीचा अंदाज 4900 डॉलर प्रति औंसवरून थेट 5400 डॉलर प्रति औंसपर्यंत वाढवला आहे. जागतिक धोरणात्मक जोखमींपासून संरक्षण मिळवण्यासाठी खाजगी क्षेत्रातील गुंतवणूकदार 2026 मध्येही सोने विकणार नाहीत, असा विश्वास या संस्थेने व्यक्त केला आहे.

चांदीच्या बाजारात मात्र तेजी कायम आहे. देशांतर्गत बाजारात चांदीचा दर 330100 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीचा हाजिर भाव वाढून 94.91 डॉलर प्रति औंसवर गेला आहे. तज्ज्ञांच्या मते, देशांतर्गत मागणी, औद्योगिक वापर आणि जागतिक आर्थिक घडामोडी यांचा एकत्रित परिणाम सोने - चांदीच्या किमतींवर पुढील काळातही होत राहणार आहे.

हेही वाचा: Farmer Loan Waiver: अखेर तारीख ठरली; या' दिवशी होणार कर्जमाफी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली मोठी अपडेट


सम्बन्धित सामग्री