12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जन्मलेल्या 2 लेकरांचा दुर्दैवी अंत; ‘त्या’ अपघातात एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू, संपूर्ण गाव शोकात

एकाच घरातून तीन जणांची अंत्ययात्रा निघाल्याचे पाहून संपूर्ण गावावर आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या अपघातात एकूण 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेक सुखी कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.

12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जन्मलेल्या 2 लेकरांचा दुर्दैवी अंत; ‘त्या’ अपघातात एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू, संपूर्ण गाव शोकात
accident

Gwalior Sheetala Mata Temple Truck Accident: मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या विद्याराम त्यागी आणि त्यांच्या कुटुंबावर नियतीने अत्यंत क्रूर आघात केला आहे. अपत्यप्राप्तीसाठी तब्बल 12 वर्षे विविध मंदिरांचे उंबरठे झिजवल्यानंतर आणि अनेक धार्मिक विधी केल्यानंतर त्यांच्या घरी अमन आणि लव या दोन मुलांचा जन्म झाला होता. मात्र, रविवारी पहाटे ग्वाल्हेर येथील शीतला माता मंदिराजवळ झालेल्या भीषण ट्रक अपघातात या दोन्ही मुलांचा आणि त्यांच्या काकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 12 वर्षांच्या प्रार्थनेचे फळ असलेल्या आपल्या दोन लेकरांना एका क्षणात गमावल्यामुळे या कुटुंबाचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश पाहून उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले.

भरधाव ट्रक गर्दीत घुसला; काका-पुतण्यांचा जागीच मृत्यू
ग्वाल्हेर येथील प्रसिद्ध शीतला माता मंदिराच्या परिसरात पहाटेच्या सुमारास धान वाहून नेणारा एक भरधाव ट्रक अनियंत्रित होऊन भाविकांच्या गर्दीत शिरला, ज्यामुळे ही भीषण दुर्घटना घडली. या अपघातात एकूण 15 भाविकांचा नाहक बळी गेला आहे, ज्यामध्ये विद्याराम यांची दोन मुले अमन (वय 15) आणि लव (वय 13) तसेच त्यांचे काका अशोक यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काकांचे आपल्या पुतण्यांवर खूप प्रेम होते. त्या रात्री दोन्ही मुलांनी मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी हट्ट धरल्यामुळे अशोक त्यांना सोबत घेऊन गेले होते; परंतु, काही तासांतच या तिघांचाही मृतांच्या यादीत समावेश झाला.

हेही वाचा – मणिपूरमध्ये अतिरेक्यांच्या गोळीबारात 3 नागरिकांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर मृतदेह ठेवत…

अपघातात अनेक सुखी कुटुंबे उद्ध्वस्त
या दुर्दैवी अपघाताने केवळ एकाच कुटुंबाचा आनंद हिरावला नाही, तर परिसरातील इतरही अनेक कुटुंबे पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहेत. शिवनगरचे रहिवासी असलेले आणि एकाच कारखान्यात एकत्र काम करणारे पवन राठोड व त्यांचे मित्र हेमंत राठोड हे देखील या अपघातात मृत्युमुखी पडले. हेमंतचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर ट्रकच्या चाकाखाली पाय आल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या पवनने त्या अत्यवस्थ परिस्थितीतही आपल्या बहिणीला फोन करून अपघाताची माहिती दिली होती. मात्र, कुटुंबीय रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच उपचारादरम्यान पवनची प्राणज्योत मालवली; त्यांचा तो शेवटचा कॉल नातेवाईकांसाठी त्याच्या आवाजाची अखेरची आठवण ठरला.

एकाच घरातील तीन अंत्ययात्रा अन् माता-पित्यांचा मन हेलावणारा आक्रोश
अपघाताचे वृत्त समजताच नातेवाईकांनी मृतदेहांचे पार्थिव मोरेना जिल्ह्यातील जौरा येथील हर गंगोली या मूळ गावी आणले. एकाच घरातून तीन जणांची अंत्ययात्रा निघाल्याचे पाहून संपूर्ण गावावर आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या कुटुंबाने आपल्या मुलांच्या संगोपनासाठी आणि आनंदासाठी अनेक वर्षे सोसलेल्या यातनांनंतर मिळालेले हे सुख केवळ एका रात्रीच्या दुर्घटनेमुळे कायमचे हिरावून घेतले गेले आहे. प्रशासनाकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण मध्य प्रदेशात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – भीषण अपघात! देवदर्शनावरून परतणाऱ्या मित्रांवर काळाचा घाला; महामार्गावरील अपघातात ट्रकच्या धडकेत चौघांचा मृत्यू

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number