मुंबई: T20 वर्ल्ड कप 2026 (T20 World Cup 2026) ला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होत असताना, त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणा साउथ आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या वॉर्म अप सामन्यात दुखापतग्रस्त झाला आहे. हा सामना 4 फेब्रुवारी रोजी नवी मुंबईत पार पडला. सामन्यादरम्यान राणा अस्वस्थ दिसत होता आणि अखेर त्याला मैदान सोडावे लागले.
वॉर्म अप सामन्यात एका ओव्हरदरम्यान हर्षित राणाने दोन वेळा आपला रन-अप मध्येच थांबवला. त्यानंतर गुडघा धरत लंगडत तो मैदानाबाहेर गेला. या सामन्यात त्याने केवळ एकच ओव्हर गोलंदाजी केली, ज्यामध्ये 16 धावा दिल्या. त्याच्या दुखापतीची नेमकी तीव्रता किती आहे, याबाबत अद्याप BCCI कडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
ही दुखापत अशा वेळी झाली आहे, जेव्हा भारतीय संघ आधीच काही महत्त्वाच्या खेळाडूंच्या फिटनेस समस्यांशी झुंज देत आहे. अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत साइड स्ट्रेनमुळे खेळू शकला नव्हता. मात्र तो अजूनही T20 वर्ल्ड कप संघाचा भाग आहे आणि वेळेत तंदुरुस्त होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: Parth Pawar Clean Chit : 1800 कोटींच्या जमीन खरेदी-गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना 'क्लीन चीट'?
दरम्यान, युवा फलंदाज तिलक वर्मा देखील न्यूझीलंड मालिकेत दुखापतीमुळे बाहेर होता. मात्र आता तो पूर्णपणे फिट झाला असून, साउथ आफ्रिकेविरुद्धच्या वॉर्म-अप सामन्यात त्याने अवघ्या 19 चेंडूत तुफानी 45 धावांची खेळी केली, ज्यामुळे त्याच्या फॉर्मबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत.
टीम इंडिया पहिला सामना 7 फेब्रुवारी रोजी USA विरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळणार आहे. स्पर्धेच्या तोंडावर हर्षित राणाची दुखापत टीम मॅनेजमेंटसाठी चिंतेचा विषय ठरली असून, विशेषतः वेगवान गोलंदाजीच्या संयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता सर्वांचे लक्ष BCCI कडे लागले असून, राणा सुरुवातीच्या सामन्यांसाठी उपलब्ध राहणार की नाही, याबाबत स्पष्टता येण्याची प्रतीक्षा आहे.
T20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघ
सूर्याकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, ईशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.
T20 वर्ल्ड कपच्या सुरुवातीपूर्वीच दुखापतींचे संकट उभे ठाकल्याने भारतीय संघासाठी पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
हेही वाचा: Sunetra Pawar: जबाबदारी वाढली आणि सुरक्षाही...; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आता 'झेड प्लस' सुरक्षा कवच