Char Dham Yatra Temporarily Suspended
Edited Image
डेहराडून: उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे चारधाम यात्रा 24 तासांसाठी थांबवण्यात आली आहे. 29 जून ते 1 जुलै या कालावधीत उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने विशेषतः 29 जून आणि 1 जुलैसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. येथे पावसामुळे आधीच अनेक भूस्खलन झाले आहेत. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काही लोक अजूनही बेपत्ता आहेत, ज्यांचा शोध सुरू आहे. अशा परिस्थितीत, अतिवृष्टीच्या इशारा लक्षात घेता, खबरदारी म्हणून चारधाम यात्रा पुढील 24 तासांसाठी थांबवण्यात आली आहे.
दरम्यान, हवामान खात्याने 1 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढतो. भूस्खलन किंवा पुरामुळे रस्ते बंद होतात आणि भाविक डोंगरात अडकतात. येत्या काही दिवसांत आणखी पाऊस आणि भूस्खलन झाल्यास यात्रा पुन्हा थांबवली जाऊ शकते. तथापी, गढवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी सांगितलं की, मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन चार धाम यात्रा पुढील 24 तासांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. हरिद्वार, ऋषिकेश, श्रीनगर, रुद्रप्रयाग, सोनप्रयाग आणि विकासनगर येथील यात्रेकरूंना थांबविण्याच्या सूचना पोलिस आणि प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. हवामान सामान्य झाल्यावर यात्रा पुन्हा सुरू करण्यात येईल, अंसही पांडे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी अंतराळात गेलेल्या शुभांशू शुक्ला यांच्याशी साधला संवाद; भारतीय अंतराळविराला दिला 'हा' गृहपाठ
उत्तरकाशीमध्ये ढगफुटी
सतत पावसामुळे उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील बारकोट परिसरातील पालीगड आणि ओजरी डाबरकोट दरम्यान सिलाई बंदजवळ ढगफुटीमुळे आठ ते नऊ कामगार बेपत्ता झाले. अधिकाऱ्यांनी येथे सांगितले की, शनिवारी मध्यरात्री 12 नंतर घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलिस, प्रशासन, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर संस्थांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे.
हेही वाचा - RAW New Chief: IPS पराग जैन यांची रॉ च्या प्रमुख पदी नियुक्ती; ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली होती मोठी भूमिका
बारकोट पोलिस ठाण्याचे प्रभारी दीपक कथेट यांनी सांगितले की, रस्ते बांधकामात गुंतलेले काही कामगार तेथे तंबूत राहत होते आणि ढगफुटीदरम्यान मोठा पूर आल्याने ते वाहून गेले. आठ ते नऊ जण बेपत्ता असल्याची माहिती आहे, ज्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. हे सर्व कामगार नेपाळी वंशाचे असल्याचे सांगितले जात आहे.