दहा रुपयांची नाणी साठवून खरेदी केली 1.23 लाख रुपयांची होंडा ॲक्टिव्हा; अनोख्या जिद्दीची राज्यभर चर्चा

दैनंदिन खरेदीदरम्यान, किराणा मालाच्या दुकानात किंवा इतर व्यवहारांतून सुट्टे पैसे म्हणून येणारे प्रत्येक 10 रुपयांचे नाणे ते अत्यंत शिस्तीने बाजूला काढून साठवून ठेवत असत.

दहा रुपयांची नाणी साठवून खरेदी केली 1.23 लाख रुपयांची होंडा ॲक्टिव्हा; अनोख्या जिद्दीची राज्यभर चर्चा
Coin collection to buy vehicle

पेशाने चर्चचे पास्टर असलेले बी. रवी जोसेफ यांनी 10 ऑक्टोबर 2023 रोजी ही नाणी साठवण्याची अनोखी मोहीम हाती घेतली होती. दैनंदिन खरेदीदरम्यान, किराणा मालाच्या दुकानात किंवा इतर व्यवहारांतून सुट्टे पैसे म्हणून येणारे प्रत्येक 10 रुपयांचे नाणे ते अत्यंत शिस्तीने बाजूला काढून साठवून ठेवत असत. याविषयी बोलताना ते म्हणाले की, “गेल्या तीन वर्षांत माझ्या दैनंदिन गरजा, किराणा मालाचा खर्च आणि अगदी बाहेरगावी जातानाही मी प्रत्येक लहान-सहान व्यवहारातून थोडे-थोडे पैसे वाचवले. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने मी सुमारे 1 लाख 23 हजार रुपयांची नाणी गोळा केली.”

सुरुवातीला या बचतीतून घरातील एखादी उपयुक्त वस्तू खरेदी करावी असा त्यांचा विचार होता, परंतु नंतर त्यांनी नाण्यांच्या या पैशातून थेट दुचाकी घेण्याचा निर्णय पक्का केला. तथापि, आर्थिक मर्यादांमुळे आपले ‘रॉयल एनफिल्ड बुलेट’ खरेदी करण्याचे मूळ स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, अशी प्रामाणिक खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कुटुंबीयांचा विरोध झुगारून कायम ठेवला आत्मविश्वास

या तीन वर्षांच्या खडतर प्रवासात त्यांच्यासमोर अनेक आव्हाने उभी राहिली होती. मधल्या काळात 10 रुपयांची नाणी चलनातून बंद होणार आहेत किंवा त्यांचे कायदेशीर मूल्य (लीगल टेंडर) रद्द होणार आहे, अशा अनेक अफवा पसरल्या होत्या. या अफवांमुळे घरातील काही सदस्यांनी त्यांना हे काम त्वरित थांबवण्याचा सल्ला दिला होता. मात्र, कुटुंबाचा विरोध असतानाही रवी जोसेफ यांनी हार मानली नाही आणि आपला निर्धार कायम ठेवला. प्रत्येक व्यवहारातून मिळणारे 10 रुपयांचे नाणे ते न चुकता आपल्या तिजोरीत किंवा साठवणूक डब्यात टाकत राहिले.

दोन तास मोजावी लागली नाणी

जेव्हा त्यांनी आपली ही तीन वर्षांची जमापुंजी म्हणजेच साठवलेली हजारो नाणी लक्सेट्टीपेट येथील ‘जगदंबा होंडा मोटर्स’ या अधिकृत शोरूममध्ये नेली, तेव्हा तेथील कर्मचारीही थक्क झाले. ती सर्व नाणी व्यवस्थित मोजण्यासाठी शोरूमच्या कर्मचाऱ्यांना तब्बल दोन तास मेहनत घ्यावी लागली. मोजणी पूर्ण झाल्यानंतर ती एकूण रक्कम अचूक 1 लाख 23३ हजार रुपये भरल्याचे स्पष्ट झाले. नवीन दुचाकीची संपूर्ण किंमत अशा प्रकारे नाण्यांच्या स्वरूपात दिल्याचे पाहून शोरूममधील कर्मचारी आणि तिथे उपस्थित ग्राहकही आश्चर्यचकित झाले.

हेही वाचा – ऐनवेळी प्रश्नपत्रिका छापणार, AI च्या मदतीनं परीक्षा केंद्रांवर.. NEET पेपरफुटी रोखण्यासाठी नंदन निलेकणींचा ‘असा’ प्लॅन

वाहन ताब्यात घेताना जोसेफ यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते. या अनोख्या पद्धतीने केलेल्या खरेदीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. रोजच्या व्यवहारातील सुट्टी नाणी कशी एका मोठ्या वैयक्तिक ध्येयात आणि स्वप्नपूर्तीत बदलू शकतात, याचे उत्तम उदाहरण जोसेफ यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number