Father Kills Daughter: शिक्षण आणि संस्कारांच्या नावाखाली वडील आणि मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत भयानक घटना फरिदाबादमध्ये उघडकीस आली आहे. केवळ 50 पर्यंत अंक मोजता आणि लिहिता आले नाहीत, या क्षुल्लक कारणावरून एका संतापलेल्या पित्याने आपल्या 4 वर्षांच्या निष्पाप मुलीला बेदम मारहाण करून तिला संपवलं. ही घटना 21 जानेवारी रोजी सेक्टर 58 पोलीस स्टेशन परिसरात घडली असून, शुक्रवारी पोलीस तपासानंतर याचे थरारक वास्तव समोर आले आहे.
वडिलांच्या मांडीवरच मुलीचा करुण अंत
आरोपी वडिलांची ओळख 31 वर्षीय कृष्णा जयस्वाल अशी झाली असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील रहिवासी आहे. फरिदाबादमध्ये तो पत्नीसोबत राहत होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्याची पत्नी दिवसा खासगी कंपनीत कामाला जात असे, तर कृष्णा घरी राहून मुलांची काळजी घेत असे. घटनेच्या दिवशी कृष्णा आपल्या मुलीला घरी शिकवत होता. त्याने तिला कागदावर 1 ते 50 पर्यंतचे अंक लिहिण्यास सांगितले. मात्र, चिमुकलीला ते लिहिता न आल्याने कृष्णाचा संयम सुटला आणि त्याने तिला अमानुषपणे मारहाण करण्यास सुरुवात केली.
मारहाणीत मुलगी बेशुद्ध आणि जागीच मृत्यू
रागाच्या भरात कृष्णाने आपल्या पोटच्या मुलीला इतक्या जोरात मारले की ती कळवळून ओरडू लागली, मात्र त्याला दया आली नाही. या मारहाणीत मुलीच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर नाजूक भागांना गंभीर दुखापत झाली. मार सहन न झाल्याने चिमुरडी अखेर बेशुद्ध पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. ज्या वडिलांच्या कुशीत मुलीला सुरक्षित वाटायला हवे होते, त्याच वडिलांच्या हातांनी तिचा बळी घेतला.
हेही वाचा - Georgia Shooting : अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीचे क्रूर कृत्य; तीन नातेवाईक आणि पत्नीवर झाडल्या गोळ्या
आई घरी परतली अन् किंकाळी फोडली
नेहमीप्रमाणे सायंकाळी जेव्हा मुलीची आई कामावरून घरी परतली, तेव्हा तिला आपली लाडकी मुलगी निर्जीव अवस्थेत पडलेली दिसली. पतीचे संशयास्पद वागणे आणि मुलीची अवस्था पाहून तिला धक्काच बसला. तिने तत्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदन तपासणीसाठी पाठवला. प्राथमिक तपासणीत मुलीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत.
आरोपीला पोलीस कोठडी
पोलिसांनी आरोपी कृष्णा जयस्वाल याला त्वरित अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने यापूर्वीही मुलीवर अशा प्रकारे अत्याचार केले होते का, याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली असून, एका निष्पाप जिवाचा केवळ शिक्षणाच्या नावाखाली बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.