Monday, March 09, 2026 08:21:59 AM

Passport Address Change: घर बदललंय? मग पासपोर्टवरील पत्ता अपडेट करण्यासाठी धावपळ करण्याची गरज नाही; फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स

पासपोर्ट सेवा पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पोलिस पडताळणी पूर्ण होते आणि अद्ययावत पासपोर्ट नवीन पत्त्यावर पाठवला जातो.

passport address change घर बदललंय मग पासपोर्टवरील पत्ता अपडेट करण्यासाठी धावपळ करण्याची गरज नाही फॉलो करा या सोप्या स्टेप्स

नवी दिल्ली: परदेशात प्रवास, उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी जाण्याचा विचार करत असाल, तर पासपोर्ट (Passport) हा अत्यंत महत्त्वाचा अधिकृत दस्तावेज ठरतो. तो व्यक्तीची ओळख आणि नागरिकत्वाचा अधिकृत पुरावा मानला जातो, तर व्हिसा (Visa) संबंधित देशात प्रवेश करण्याची परवानगी देतो. मात्र अनेक नागरिक घर किंवा शहर बदलल्यानंतर पासपोर्टमधील पत्ता अपडेट करण्याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे पुढील प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात.

घर बदलल्यानंतर पासपोर्टमध्ये नवीन पत्ता नोंदवणे अत्यावश्यक असते. पत्ता अपडेट न केल्यास पोलिस पडताळणी (Police Verification), व्हिसा प्रक्रिया किंवा दूतावास तपासणीदरम्यान समस्या उद्भवू शकतात. सध्या ही प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली असून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू करता येते. काही सोप्या टप्प्यांचे पालन करून घरबसल्या पत्ता बदलता येतो.

पासपोर्टमधील पत्ता बदलण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ www.passportindia.gov.in वर जावे लागते. येथे नवीन वापरकर्ता नोंदणी करून लॉगिन करावे. त्यानंतर Reissue of Passport हा पर्याय निवडून Change in Existing Personal Particulars या पर्यायावर क्लिक करावे. पुढे आपल्या वैध पत्त्याच्या पुराव्यानुसार नवीन पत्ता अचूक भरावा.

हेही वाचा: Dearness Allowance Hike: सातव्या वेतन आयोगाची मोठी झेप; आता महागाई भत्त्यामध्ये होणार 'इतकी' वाढ, 'या' तारखेला होणार अधिकृत घोषणा

यानंतर आधार कार्ड, वीज बिल किंवा इतर वैध कागदपत्रांची स्कॅन प्रत अपलोड करावी लागते. शुल्क ऑनलाइन भरावे लागते. 36 पानांच्या पासपोर्टसाठी 1500 रुपये, तर 60 पानांच्या पासपोर्टसाठी 2000 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पासपोर्ट सेवा केंद्र (Passport Seva Kendra) किंवा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र येथे अपॉइंटमेंट बुक करावी. निश्चित तारखेला जुना पासपोर्ट, नवीन पत्त्याचा पुरावा, स्वसाक्षांकित कागदपत्रांच्या प्रती आणि आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक असते.

पत्ता अपडेटसाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, मागील तीन महिन्यांतील वीज किंवा पाणी बिल, भाडेकरार (Rent Agreement), मागील 12 महिन्यांचे बँक स्टेटमेंट किंवा गॅस कनेक्शन बिल यांसारखी कागदपत्रे वैध मानली जातात. पती किंवा पत्नीच्या पासपोर्टमध्ये नाव नोंदलेले असल्यास त्याची प्रतही उपयोगी ठरू शकते.

नवीन शहरात स्थलांतर केल्यास सहसा पोलिस पडताळणी केली जाते. पासपोर्ट कार्यालयाकडून संबंधित माहिती स्थानिक पोलिस ठाण्याकडे पाठवली जाते आणि अधिकारी दिलेल्या पत्त्यावर भेट देऊन तपासणी करतात. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांत अपडेट केलेला पासपोर्ट नवीन पत्त्यावर पाठवण्यात येतो.

हेही वाचा: Beed Crime News: परळीत खळबळ! महादेव मुंडे यांच्या मुलाला रस्त्यात अडवून मारहाण, मोठ्या षडयंत्राचा संशय


सम्बन्धित सामग्री