मुंबई: इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांसाठी करिअरची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. देशातील अग्रगण्य तेल आणि वायू क्षेत्रातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Hindustan Petroleum Corporation Limited, HPCL) ने 608 ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी (Graduate Apprentice Trainee) पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. तांत्रिक शिक्षणानंतर नामांकित सरकारी कंपनीत प्रशिक्षण घेत उद्योग क्षेत्रात चांगली करिअरची सुरुवात करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बीई किंवा बीटेक (BE/BTech) पदवी असणे आवश्यक आहे. ही पदवी सिव्हिल (Civil), मेकॅनिकल (Mechanical), इलेक्ट्रिकल (Electrical) किंवा इन्स्ट्रुमेंटेशन (Instrumentation) शाखेत असावी.
सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 60 टक्के गुण आवश्यक आहेत, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी किमान 50 टक्के गुणांची अट ठेवण्यात आली आहे. तसेच उमेदवाराने 1 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर पदवी उत्तीर्ण केलेली असणे अनिवार्य आहे.
हेही वाचा: T20 World Cup 2026: एकही सामना न खेळता भारत सेमीफायनलमध्ये? ICC चा नियम ऐकून तुम्हीही चकित व्हाल
वयोमर्यादा
अर्जदाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे असावे. शासनाच्या नियमानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गाला पाच वर्षे, ओबीसी प्रवर्गाला तीन वर्षे, तर दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षांची वयोमर्यादा सवलत लागू राहील.
निवड प्रक्रिया
या भरती प्रक्रियेत कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत (Interview) घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड पूर्णपणे गुणवत्तेनुसार (Merit Basis) केली जाणार आहे. बीई किंवा बीटेक पदवीतील मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येईल. सर्व कागदपत्रे योग्य आढळल्यानंतर अंतिम निवड निश्चित केली जाईल.
स्टायपेंड किती मिळणार?
निवड झालेल्या ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी उमेदवारांना दरमहा एकूण 25,000 रुपये स्टायपेंड दिला जाणार आहे. यामध्ये 20,500 रुपये एचपीसीएलकडून दिले जातील, तर 4,500 रुपये भारत सरकारकडून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (Direct Benefit Transfer, DBT) माध्यमातून जमा केले जातील.
अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर “Apprentice 2026” या पर्यायावर क्लिक करावे. पुढे “New Registration” निवडून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. नोंदणीनंतर ई-मेलवर लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त होईल. लॉगिन करून वैयक्तिक माहिती भरावी, संबंधित इंजिनिअरिंग शाखा आणि एक राज्य निवडावे. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करावा आणि भविष्यातील वापरासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवावी.
हेही वाचा: India US Trade Deal: भारत-अमेरिका महत्त्वाची बैठक अचानक रद्द; टॅरिफवर अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम