नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा धक्का बसला आहे. चीनने भारतासोबत थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने आशियात नवे समीकरण तयार होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चायना ईस्टर्न एअरलाइन्स 9 नोव्हेंबरपासून दिल्ली–शांघाय दरम्यान थेट उड्डाण सुरू करणार असून, ही सेवा आठवड्यातून तीन वेळा उपलब्ध असेल.
ट्रम्प प्रशासनाच्या काळात अमेरिकेने भारतावर 50 टक्क्यांपर्यंत कर लावल्याने व्यापारसंबंध ताणले गेले होते. या पार्श्वभूमीवर भारताने आशियातील अन्य देशांशी आर्थिक संबंध मजबूत करण्यास प्राधान्य दिले. चीनसोबत थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय हे त्याचेच एक उदाहरण मानले जात आहे.
2019 मध्ये भारत आणि चीन दरम्यान एकूण 539 थेट उड्डाणे सुरु होती. मात्र कोविड-19 महामारीमुळे मार्च 2020 मध्ये सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे थांबवावी लागली. त्यानंतर भारत आणि चीनमधील प्रवाशांना आग्नेय आशियातील इतर देशांमार्गे प्रवास करावा लागत होता.
आता, पाच वर्षांनंतर, चायना ईस्टर्न एअरलाइन्स पुन्हा एकदा भारताच्या आकाशात झेपावणार आहे. दरम्यान, भारताची इंडिगो विमान कंपनी देखील 26 ऑक्टोबरपासून कोलकाता–ग्वांगझू आणि 10 नोव्हेंबरपासून दिल्ली–ग्वांगझू मार्गावर उड्डाणे सुरू करणार आहे. एअर इंडिया ही यावर्षाअखेरीस चीनसाठी सेवा पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत आहे.
हेही वाचा : India Russia trade: ट्रम्प यांच्या डॉलर पेमेंटच्या दादागिरीला भारताचे प्रत्युत्तर, रशियन तेल खरेदीत केला मोठा बदल
नागरी उड्डयन मंत्रालयाच्या माहितीनुसार, हा निर्णय दोन्ही देशांच्या नागरी उड्डयन अधिकाऱ्यांमधील सातत्यपूर्ण तांत्रिक चर्चेचा परिणाम आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, “या उपक्रमामुळे भारत-चीन दरम्यान थेट संपर्क वाढेल, लोकांमधील संवाद मजबूत होईल आणि द्विपक्षीय आर्थिक सहकार्याला नवी चालना मिळेल.”
आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते, भारत आणि चीनमधील जवळीक वाढल्याने अमेरिकेच्या प्रभावाला काही प्रमाणात आव्हान निर्माण होऊ शकते. त्यामुळेच ट्रम्प आणि त्यांचे समर्थक याबाबत स्पष्टपणे अस्वस्थ आहेत. आशियात निर्माण होणारे हे नवे हवाई आणि आर्थिक समीकरण भविष्यात जागतिक राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे संकेत मिळत आहेत.
हेही वाचा : Divorce Law India: घटस्फोटानंतर 'या' महिलांना मिळणार नाही पोटगी! हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय