पटना: बिहारमधील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत सुरू असलेला मतभेदांचा सूर आता जवळपास निवळला आहे. आरजेडी (RJD) आणि काँग्रेसमध्ये झालेल्या चर्चेनंतर अखेर महागठबंधनाने एकमताने निर्णय घेतला आहे की, आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रीपदाचे चेहरा असतील. अधिकृत घोषणा पुढील काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.
महागठबंधनातील सूत्रांच्या माहितीनुसार, सर्व घटक पक्षांनी तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली “चलो बिहार, बिहार बदलें” हे नवे घोषवाक्य देण्यात येणार आहे. या घोषणेद्वारे आघाडीने बिहारमध्ये परिवर्तनाचे नवे राजकारण उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपावरून तणाव निर्माण झाला होता. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी काही जागांवरील निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र बुधवारी (22 ऑक्टोबर) काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि बिहार निवडणुकीचे प्रभारी अशोक गेहलोत यांनी लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांची भेट घेऊन परिस्थिती स्पष्ट केली. या चर्चेनंतर आघाडीतील मतभेद दूर झाले आणि सर्व पक्षांनी तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वावर सहमती दर्शवली.
हेही वाचा: Delhi Taj Hotel: ताज हॉटेलमध्ये कोल्हापुरी चप्पल आणि मांडी घालून बसण्यावरून महिलेला अपमानास्पद वागणूक, व्हिडीओ शेअर करत महिला संतापली
महागठबंधनाची अधिकृत पत्रकार परिषद पटना येथील मौर्य हॉटेलमध्ये आयोजित केली जाणार आहे. या कार्यक्रमात आरजेडी, काँग्रेस, सीपीआय, सीपीआय(एम), सीपीआय(माले) आणि इतर घटक पक्षांचे नेते उपस्थित राहतील. विशेष म्हणजे, या पत्रकार परिषदेच्या पोस्टरवर केवळ तेजस्वी यादव यांचेच छायाचित्र छापण्यात आले असून, इतर कोणत्याही नेत्याचा फोटो नसल्याचे लक्षात येते. पोस्टरवर सर्व घटक पक्षांची चिन्हे मात्र आहेत, ज्यातून तेजस्वींच्या नेतृत्वाखाली एकसंघ लढाईचे चित्र समोर येत आहे.
मतभेदानंतर आता ऐक्याचा संदेश
गेल्या काही महिन्यांत आघाडीतील मतभेदांमुळे बिहारमधील विरोधकांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली होती. काही जागांवर आघाडीतीलच उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे राहिले होते. मात्र, गेहलोत यांच्या मध्यस्थीनंतर हे सर्व वाद मिटल्याचे दिसत आहे. अशोक गेहलोत यांनी चर्चेनंतर माध्यमांना सांगितले की, “आघाडीत सर्व काही ठीक आहे आणि लवकरच एकसंघ घोषणा होईल.”
आघाडीचा एकमुखी निर्णय
महागठबंधनातील सर्व पक्षांनी तेजस्वी यादव यांना तरुण आणि ताकदीचा नेता म्हणून स्वीकारले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये रोजगार, शिक्षण आणि विकास या मुद्यांवर एकत्रित मोहीम राबवली जाणार आहे. निवडणूक प्रचारात आघाडी ‘बदल का भरोसा, तेजस्वी के साथ’ या घोषवाक्याने मतदारांपर्यंत पोहोचण्याची तयारी करत आहे.
दरम्यान, येत्या काही दिवसांत पटना येथे आयोजित होणाऱ्या संयुक्त पत्रकार परिषदेत तेजस्वी यादव यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. आघाडीतील सर्व प्रमुख नेते या कार्यक्रमात हजर राहतील आणि निवडणूक धोरणाची दिशा स्पष्ट करतील.
बिहारमध्ये आता राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात आघाडी एकत्र आली असली, तरी सत्ताधारी एनडीएला टक्कर देण्यासाठी हा एकमुखी निर्णय किती परिणामकारक ठरतो, हे येत्या काही आठवड्यांत स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा: Mumbai Terrible Fire : जोगेश्वरीतील बिझनेस सेंटर इमारतीला भीषण आग, बचावकार्य युद्धपातळीवर