Ahmedabad Plane Crash Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद येथील विमान अपघातस्थळी आणि सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी त्यांनी एअर इंडिया विमान अपघातात वाचलेला जिवंत प्रवासी विश्वास कुमार रमेश यांची भेट घेतली. संभाषणादरम्यान विश्वास यांनी पंतप्रधान मोदींनी अपघाताचा सर्व थरार सांगितला. विश्वास कुमार यांनी सांगितले की, 'मी विमानातून उडी मारली नाही, अपघाताच्या वेळी सीटसह बाहेर फेकला गेलो. उड्डाणानंतर सुमारे तीस सेकंदांनी एक मोठा स्फोट झाला. अचानक सर्व काही हादरले आणि विमान कोसळले. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा आजूबाजूला फक्त मृतदेह होते. मी हादरलो. कसा तरी मी उभा राहिलो आणि पळू लागलो. सर्वत्र कचरा पसरलेला होता. कोणीतरी मला पकडले आणि रुग्णवाहिकेत बसवले आणि नंतर मला रुग्णालयात आणण्यात आले.'
गुरुवारी लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून दुपारी 1:38 वाजता उड्डाण केले. उड्डाणानंतर काही सेकंदांनीच विमान बीजे मेडिकल कॉलेज हॉस्टेलच्या इमारतीला आदळले. या भीषण अपघातात विमानात असलेल्या 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघातात फक्त विश्वास कुमार या एकमेव प्रवाशाचे प्राण वाचले.
हेही वाचा - अहमदाबाद विमान दुर्घटनेत पिंपरी-चिंचवडच्या इरफान शेखचा मृत्यू
कोण आहे विश्वास कुमार रमेश?
दरम्यान, एअर इंडियाच्या विमानात विश्वास कुमार रमेश त्यांच्या भावापासून वेगळे बसले होते. विश्वास कुमार रमेश हे ब्रिटिश नागरिक आहेत, जे त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी भारतात आले होते. विश्वास कुमार हे त्यांचा मोठा भाऊ अजय कुमार रमेश यांच्यासोबत युकेला परतत होते. अपघाताच्या वेळी विश्वास विमानाच्या 11 अ सीटवर बसले होते, तर त्यांचा भाऊ दुसऱ्या रांगेत होता. अपघातानंतर काही तासांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये रक्ताने माखलेला विश्वास कुमार रुग्णवाहिकेकडे चालत जाताना दिसत होते.
हेही वाचा - अपघातग्रस्त एअर इंडिया विमानाचा DVR सापडला; अपघाताचे कारण समजण्यास होणार मदत? काय आहे या उपकरणाची खासियत?
आज पंतप्रधान मोदींनी विश्वास कुमार रमेश यांची भेट घेतली. तसेच त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. विश्वास यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. अहमादाबादमध्ये झालेला अपघात अत्यंत भीषण होता. तथापि, भारतातील विमान अपघातातील आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात ठरला.