नवी दिल्ली: बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल बँकिंग सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection, IBPS) ने आज, 2 मार्च 2026 रोजी IBPS Clerk Mains Result 2026 जाहीर केला आहे. मेन्स परीक्षा दिलेल्या उमेदवारांना आता अधिकृत संकेतस्थळ www.ibps.in वर जाऊन निकाल आणि स्कोअरकार्ड तपासता व डाउनलोड करता येणार आहे.
या परीक्षेत यश मिळवलेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात दस्तऐवज पडताळणी (Document Verification) आणि वैद्यकीय तपासणी (Medical Examination) साठी बोलावले जाणार आहे. हे दोन्ही टप्पे पूर्ण केल्यानंतरच अंतिम नियुक्ती प्रक्रिया पार पडेल. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
IBPS Clerk Mains परीक्षा 29 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आली होती. देशभरातील विविध बँकांमधील एकूण 15,701 पदे भरण्यासाठी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या भरतीअंतर्गत Customer Service Associate (CSA) पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. देशभरातून लाखो उमेदवारांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता.
हेही वाचा: Sonali Kulkarni: 'मी तयारी पूर्ण ...' सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला हिंदी ओटीटी शोमधून अचानक काढलं; धक्कादायक कारण समोर
निवड प्रक्रिया तीन मुख्य टप्प्यांत पूर्ण होते. प्राथमिक परीक्षा (Prelims) उत्तीर्ण करणे आवश्यक असले तरी त्याचे गुण अंतिम गुणवत्ता यादीत (Merit List) धरले जात नाहीत. ती केवळ पात्रता परीक्षा असते. अंतिम निवड पूर्णपणे मुख्य परीक्षेतील गुणांवर आधारित असते. त्यामुळे मेन्स परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संबंधित राज्याच्या स्थानिक भाषेची चाचणी द्यावी लागते.
उमेदवाराच्या स्कोअरकार्डमध्ये नाव, वडिलांचे नाव, प्रवर्ग व उपप्रवर्ग, अर्ज केलेले राज्य, मेन्स परीक्षेची तारीख तसेच उत्तीर्ण/अनुत्तीर्ण स्थिती अशी माहिती नमूद असेल. निकाल डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी www.ibps.in या संकेतस्थळावर जाऊन “CRP Clerical Cadre” या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर “Result of Online Main Examination” पर्याय निवडून नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकल्यास निकाल स्क्रीनवर दिसेल.
या परीक्षेत नेगेटिव्ह मार्किंग पद्धत लागू होती. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश (0.25) गुण वजा केले जात होते. त्यामुळे विचारपूर्वक उत्तर देणाऱ्या उमेदवारांना याचा फायदा झाला असण्याची शक्यता आहे. आता पुढील टप्प्याकडे सर्व उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: Dahisar-Mira-Bhayander Metro: मिरा-भाईंदरकरांसाठी खुशखबर! मेट्रो 9 च्या पहिल्या टप्प्याची यशस्वी चाचणी, लवकरच सुरू होणार सेवा