मुंबई: ICC T20 World Cup 2026 चा रणसंग्राम कालपासून सुरू झाला आणि पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने घरच्या मैदानावर, म्हणजेच वानखेडे स्टेडीयमवर विजयाचा गुलाल उधळला. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने अमेरिकेवर 29 धावांनी मात करत स्पर्धेची सुरुवात दणक्यात केली आहे. भारताने ठेवलेल्या 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकेच्या संघाला निर्धारित षटकांत 132 धावांपर्यंतच पोहचता आले. या विजयासह भारताने स्पर्धेतील पहिले दोन गुण मिळवले आहेत.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात एखाद्या वाईट स्वप्नासारखी झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर तंबूत परतला आणि तिथूनच भारताच्या डावाची पडझड सुरू झाली. पॉवरप्लेमध्ये अमेरिकेचा गोलंदाज शॅडली वान शल्कविकने अक्षरशः धुमाकूळ घातला. त्याने एकाच षटकात ईशान किशन (20), तिलक वर्मा (25) आणि शिवम दुबे (0) यांना माघारी धाडत भारताची अवस्था 4 बाद 46 अशी दयनीय केली. मधल्या फळीत रिंकू सिंग आणि हार्दिक पांड्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण ते देखील स्वस्तात बाद झाले.
T20 World Cup. India Won by 29 Run(s) https://t.co/Rlm2ARPVEt #TeamIndia #INDvUSA #T20WorldCup — BCCI (@BCCI) February 7, 2026
संकटाच्या काळात कर्णधार सूर्यकुमार यादव मात्र खऱ्या अर्थाने ‘संकटमोचक’ ठरला. एकीकडे विकेट्सची रांग लागली असताना, सूर्याने खेळपट्टीवर पाय रोवून उभे राहणे पसंत केले. त्याने 49 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 84 धावांची झुंजार खेळी केली. त्याला अक्षर पटेलने 14 धावा करत साथ दिली, ज्यामुळे भारताला 9 विकेट्सच्या मोबदल्यात 161 धावांचा सन्मानजनक टप्पा गाठता आला. अमेरिकेकडून शॅडली वान शल्कविकने 25 धावांत चार बळी घेत त्याची छाप पाडली.
8️⃣4️⃣* Runs
4️⃣9️⃣ Balls
? fours
4⃣ sixes A captain’s knock from @surya_14kumar when it mattered most ? Scorecard ▶️ https://t.co/Rlm2ARPnOV#TeamIndia | #MenInBlue | #T20WorldCup | #INDvUSA pic.twitter.com/eTTGi6fnpb — BCCI (@BCCI) February 7, 2026
162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या अमेरिकन संघाची सुरुवातही भारतीय गोलंदाजांनी खराब केली. पॉवरप्लेमध्येच अमेरिकेचे तीन प्रमुख फलंदाज माघारी परतले होते. मात्र, मिलिंद कुमार (34) आणि संजय कृष्णमूर्ती (37) यांनी चौथ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी करत अमेरिकेच्या आशा जिवंत ठेवल्या. मिलिंद कुमारने काही आकर्षक फटकेबाजी केली, पण वरुण चक्रवर्तीने ही जोडी फोडून भारताला पुन्हा सावरले.
सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात अक्षर पटेलची फिरकी जादूई ठरली. त्याने संजय कृष्णमूर्ती आणि हरमीत सिंग यांना बाद करत अमेरिकन डावाचे कंबरडे मोडले. अखेरीस अमेरिकेचा संघ 132 धावांवर रोखला गेला आणि भारताने 29 धावांनी विजय मिळवला. वानखेडेच्या प्रेक्षकांच्या साक्षीने भारताने हा सामना जिंकत विश्वचषकात दिमाखदार एन्ट्री केली आहे. आता पुढील सामन्यांमध्ये भारतीय संघ हीच लय कायम राखणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.