Thursday, July 17, 2025 02:01:52 AM

अपघातात चालकाच्या स्वतःच्या चुकीमुळे मृत्यू झाला तर विमा कंपनी भरपाई देण्यास बांधील नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

स्टंट करणाऱ्यांसाठी न्यायालयाचा हा निर्णय मोठा संदेश मानला जात आहे. न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने मृताची पत्नी, मुलगा आणि पालकांची भरपाईची मागणी फेटाळून लावली.

अपघातात चालकाच्या स्वतःच्या चुकीमुळे मृत्यू झाला तर विमा कंपनी भरपाई देण्यास बांधील नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Edited Image

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने एका विमा कंपन्यांकडून मिळणाऱ्या भरपाई संदर्भात मोठा निर्णय दिला आहे. जर एखाद्या चालकाचा निष्काळजीपणामुळे किंवा स्टंट करताना वेगाने किंवा चुकीच्या पद्धतीने गाडी चालवताना मृत्यू झाला तर विमा कंपन्या त्याच्या कुटुंबाला भरपाई देण्यास बांधील राहणार नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. स्टंट करणाऱ्यांसाठी न्यायालयाचा हा निर्णय मोठा संदेश मानला जात आहे. न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने मृताची पत्नी, मुलगा आणि पालकांची भरपाईची मागणी फेटाळून लावली.

काय आहे प्रकरण? 

सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय एका व्यक्तीशी संबंधित प्रकरणात दिला, जो वेगाने आणि निष्काळजीपणे कार चालवताना अपघाताचा बळी ठरला. हा अपघात 18 जून 2014 रोजी झाला, जेव्हा एन.एस. रवीश कर्नाटकातील मल्लासंद्रा गावातून त्याच्या फियाट लाइना कारने अर्सिकेरे शहराकडे जात होता. त्याचे वडील, बहीण आणि बहिणीची मुले त्याच्यासोबत होती. रवीशने वेगाने आणि निष्काळजीपणे कार चालवली आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. मैलानहल्ली गेटजवळ त्याने गाडीवरील नियंत्रण गमावले, ज्यामुळे गाडी उलटली. या अपघातात रवीश गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा - पंतप्रधान मोदींना घानाचा 'ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' पुरस्कार प्रदान

मृताच्या कुटुंबियांकडून नुकसान भरपाईची मागणी - 

रवीशच्या कुटुंबाने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून 80 लाख रुपयांची भरपाई मागितली होती. कुटुंबाने दावा केला होता की रवीश कंत्राटदार म्हणून दरमहा 3 लाख रुपये कमवत होता. परंतु पोलिसांच्या आरोपपत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की हा अपघात रवीशच्या निष्काळजीपणामुळे आणि जास्त वेगामुळे झाला. 

दरम्यान, मोटार अपघात न्यायाधिकरणाने कुटुंबाची मागणी फेटाळून लावली होती. कर्नाटक उच्च न्यायालयाने 23 नोव्हेंबर 2014 रोजी कुटुंबाचे अपील फेटाळून लावले आणि म्हटले की जेव्हा अपघात मृताच्या स्वतःच्या चुकीमुळे होतो तेव्हा कुटुंब विमा भरपाई मागू शकत नाही. तथापी, उच्च न्यायालयाने म्हटले की कुटुंबाला हे सिद्ध करावे लागेल की, अपघात मृताच्या चुकीमुळे झाला नाही आणि तो विमा पॉलिसीच्या कक्षेत होता. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा हा निर्णय कायम ठेवला आणि कुटुंबाची याचिका फेटाळली. 

हेही वाचा - 'आय लव्ह यू' म्हणणे छेडछाड किंवा लैंगिक छळ नाही; उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

जर मृत्यू चालकाच्या स्वतःच्या चुकीमुळे झाला असेल आणि कोणतेही बाह्य कारण नसेल, तर विमा कंपनी भरपाई देण्यास बांधील नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. रस्ता सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि निष्काळजीपणे गाडी चालवणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. 
 


सम्बन्धित सामग्री