Pilots' Union Demand: अहमदाबाद येथे 12 जून रोजी झालेल्या एअर इंडिया बोईंग 787 विमान अपघातानंतर वैमानिक संघटना आता अधिक सतर्क झाली आहे. कोणताही निष्काळजीपणा सहन न करण्याच्या भूमिकेत राहत, फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स (FIP) ने नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ला सर्व बोईंग 787 विमानांच्या विद्युत प्रणालींची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे.
ही मागणी अमृतसरहून बर्मिंगहॅमला जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग 787 विमानाच्या तांत्रिक बिघाडानंतर करण्यात आली आहे. 4 ऑक्टोबर रोजी या विमानातील रॅम एअर टर्बाइन (RAT) अनपेक्षितपणे सक्रिय झाली. मात्र पायलट्सनी प्रसंगावधान राखत विमान सुरक्षितपणे उतरवले. एअर इंडियाने सांगितले की, RAT हे उपकरण इंजिन किंवा इलेक्ट्रॉनिक बिघाड झाल्यास आपोआप सुरू होते आणि आपत्कालीन वीज पुरवठा सुनिश्चित करते.
हेही वाचा - Coldrif Cough Syrup: कफ सिरपमुळे मृत्यूचं तांडव! बैतुलमध्ये आणखी 2 मुलांचा मृत्यू; केंद्र सरकारच्या राज्यांना कडक सूचना
दरम्यान, FIP चे अध्यक्ष जी.एस. रंधावा यांनी DGCA ला पाठवलेल्या पत्रात नमूद केले की, एअरक्राफ्ट हेल्थ मॉनिटरिंग (AHM) प्रणालीने बस पॉवर कंट्रोल युनिट (BPCU) मध्ये बिघाड नोंदवला आहे, जो RAT सक्रिय होण्याचे कारण असू शकते. रंधावा यांनी या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे सांगितले आणि देशातील सर्व बोईंग 787 विमानांची तांत्रिक तपासणी तातडीने करण्याची मागणी केली. पत्रात पुढे म्हटले आहे की, बर्मिंगहॅमजवळ येताना विमानाच्या 500 फूट उंचीवर RAT स्वयंचलितपणे सक्रिय झाल्याचे आढळले. अशा घटनांचा थेट संबंध विमानाच्या इलेक्ट्रिकल सिस्टीमशी आहे. FIP ने नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) यांनाही या विषयावर सखोल चौकशी करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा - Air India Emergency Landing: मोठा अपघात टळला! टर्बाइन बंद पडल्याने एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलाइनरचे ब्रिटनमध्ये इमर्जन्सी लँडिंग
तथापी, 12 जून रोजी झालेल्या बोईंग 787-8 विमान अपघाताची चौकशी अद्याप सुरू आहे. AI 171 या लंडन गॅटविककडे जाणाऱ्या विमानाचे इंजिन उड्डाणानंतर काही सेकंदातच बंद झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्या वेळी विमानात 241 प्रवासी होते. या अपघातानंतर देशभरात विमान सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहेत. वैमानिक संघटनेची मागणी पूर्ण झाली, तर भारतातील सर्व बोईंग 787 विमानांवर व्यापक सुरक्षा तपासणी होण्याची शक्यता आहे.