नेपिअर: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आपला विजयरथ सुसाट राखत न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने दिलेले 154 धावांचे आव्हान भारताने अवघ्या 10 षटकांत पूर्ण करत किवी गोलंदाजीची अक्षरशः वाट लावली. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी अभेद्य आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे. वनडे मालिकेतील पराभवाचा सव्याज बदला घेत भारताने टी-20 फॉरमॅटमधील आपले वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
अभिषेक शर्माची ‘तूफान’ खेळी
सलामीवीर अभिषेक शर्माने चौफेर फटकेबाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना अक्षरशः पाणी पाजले. त्याने अवघ्या 14 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत भारतीय डावाचा पाया भक्कम केला. अभिषेकने 20 चेंडूंमध्ये नाबाद 68 धावांची खेळी केली, ज्यात पाच षटकार आणि सात चौकारांचा समावेश होता. त्याच्या या वादळी फलंदाजीमुळे न्यूझीलंडचा संघ सामन्यातून पूर्णपणे बाहेर फेकला गेला. दुसऱ्या बाजूने कर्णधार सूर्यकुमार यादवनेही आपली लय कायम ठेवत 26 चेंडूंमध्ये 57 धावा केल्या. सूर्याने तीन षटकार आणि सहा चौकारांच्या जोरावर किवी आक्रमण निष्प्रभ केले.
हेही वाचा: Kolhapur Accident : मृत्यूपुढे नियती हरली ! अपघातात आई-वडिलांचा अंत, पण 8 महिन्यांच्या चिमुरडीला 'या' एका गोष्टीमुळे साधं खरचटलंही नाही
संजू सॅमसनचा फ्लॉप शो, ईशानची मोलाची साथ
विजयाचा आनंद मोठा असला तरी संजू सॅमसन पुन्हा एकदा अपयशी ठरला असून त्याला खातेही उघडता आले नाही. ही बाब टीम इंडियासाठी चिंतेची ठरू शकते. मात्र, ईशान किशनने 28 धावांची उपयुक्त खेळी करत अभिषेकला भक्कम साथ दिली. भारतीय संघाने 10 षटकांत 2 बाद 155 धावा करत टी-20 क्रिकेटमधील आक्रमकतेचा नवा मापदंड प्रस्थापित केला.
भारतीय गोलंदाजांचा टिच्चून मारा
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंड विरुद्ध भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी केली. डेव्हॉन कॉनवेला हर्षित राणाने अवघ्या एक धावेवर बाद करत पहिला धक्का दिला. हार्दिक पांड्याने रचिन रवींद्रची शिकार केली, तर जसप्रीत बुमराहने टीम सायफर्टला बाद करत किवींची मधली फळी उध्वस्त केली. न्यूझीलंडकडून मार्क चॅपमनने सर्वाधिक 32 धावा केल्या, मात्र रवी बिश्नोईने त्याला बाद करत धावसंख्येवर लगाम घातला. भारताच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे न्यूझीलंडला 20 षटकांत 9 बाद 153 धावांपर्यंतच मजल मारता आली.
टी-20 वर्ल्डकपपूर्वी मिळवला विश्वास
भारतीय चाहत्यांसाठी सर्वात दिलासादायक बाब म्हणजे कर्णधार सूर्यकुमार यादवचा फॉर्म. धावांसाठी झगडत असलेल्या सूर्याने सलग दोन सामन्यांत अर्धशतके झळकावत आपणच टी-20 क्रिकेटचा ‘किंग’ असल्याचे सिद्ध केले आहे. आगामी टी-20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादवसारखे स्फोटक फलंदाज फॉर्मात येणे ही टीम इंडियासाठी मोठी जमेची बाजू ठरत आहे.
हेही वाचा: IPS Abhijit Patil Success Story : लहान मुलासारखा दिसणारा IPS अधिकारी आहे तरी कोण? लहान वयात UPSC पास करणाऱ्या अधिकाऱ्याबद्दल सविस्तरपणे जाणून घ्या