Tuesday, February 17, 2026 09:09:30 PM

Kolhapur Accident : मृत्यूपुढे नियती हरली ! अपघातात आई-वडिलांचा अंत, पण 8 महिन्यांच्या चिमुरडीला 'या' एका गोष्टीमुळे साधं खरचटलंही नाही

जिगर किशोर नाकराने (24) आणि त्यांची पत्नी ऋतिका नाकराने (24) हे शुक्रवारी एका सामूहिक विवाह सोहळ्यासाठी हुबळीला गेले होते.

kolhapur accident  मृत्यूपुढे नियती हरली  अपघातात आई-वडिलांचा अंत पण 8 महिन्यांच्या चिमुरडीला या एका गोष्टीमुळे साधं खरचटलंही नाही

Kolhapur Accident : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर निपाणीजवळ झालेल्या एका भीषण अपघातात कोल्हापूरचे तरुण उद्योजक जिगर नाकराने आणि त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी अंत झाला आहे. नियतीच्या या क्रूर खेळात आई-वडिलांनी प्राण गमावले. मात्र, कारमधील एका वस्तूमुळे त्यांच्या 8 महिन्यांच्या मुलीचा जीव सुदैवाने वाचला आहे.

आनंदाचा सोहळा ठरला अखेरचा प्रवास

मूळचे गुजरातचे असलेले आणि कोल्हापूरच्या पाचगाव रोड परिसरात राहणारे जिगर किशोर नाकराने (24) आणि त्यांची पत्नी ऋतिका नाकराने (24) हे शुक्रवारी एका सामूहिक विवाह सोहळ्यासाठी हुबळीला गेले होते. सोहळा आटोपून कोल्हापूरकडे परतत असताना हा अपघात झाला.

कसा झाला अपघात? 

दरम्यान, कोगनोळी चेकपोस्टजवळ रस्त्याच्या कडेला पावती फाडण्यासाठी उभ्या असलेल्या एका कंटेनरला (RJ 14 GG 9017) जिगर यांच्या कारने (MH 09 FV 3877) मागून जोरदार धडक दिली. कारचा वेग जास्त असल्याने पुढच्या भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. कारची धडक इतकी तीव्र होती की एअरबॅग्स उघडल्या आणि कारने पेट घेतला. मात्र, मागच्या सीटवर वृष्टी ही 8 महिन्यांची मुलगी एका पाळण्यात सुरक्षितपणे झोपलेली होती. या पाळण्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली नाही आणि ती मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर आली.

हेही वाचा - Mumbai-Pune Expressway : सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी फिरायला निघालात? त्याआधी मुंबई–पुणे एक्सप्रेसवरील गाड्यांची लांबच लांब रांग पाहा

रुग्णालयात उपचार सुरू असतानाच सोडला श्वास

अपघातानंतर घटनास्थळावरील नागरिकांनी आणि पोलिसांनी जखमी दाम्पत्याला तातडीने कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री ऋतिका यांचा आणि मध्यरात्री जिगर यांचा मृत्यू झाला. जिगर नाकराने यांचा कागल एमआयडीसीमध्ये प्लायवूड आणि लाकडी दरवाजांचा मोठा व्यवसाय होता. एक हसते-खेळते कुटुंब या अपघातामुळे उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कंटेनर चालकावर गुन्हा दाखल

याप्रकरणी निपाणी ग्रामीण पोलिसांनी राजस्थानच्या इम्तिहास अली या कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रस्त्यावर अनधिकृतपणे कंटेनर उभा केल्याने हा घात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.


सम्बन्धित सामग्री