Friday, March 13, 2026 07:53:05 AM

Online Investment Scam: गुंतवणुकीच्या नावाखाली लूट! 800 बँक खाती आणि 600 आरोपी, पोलिसांची सायबर गुन्हेगारीविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम

पोलिसांनी 250 कोटी रुपयांच्या ऑनलाइन गुंतवणूक घोटाळ्याचा भंडाफोड केला आहे. ‘पैसा वॉल्ट’सारख्या बनावट वेबसाइटद्वारे देशभरातील लोकांची फसवणूक केली जात होती.

online investment scam गुंतवणुकीच्या नावाखाली लूट 800 बँक खाती आणि 600 आरोपी पोलिसांची सायबर गुन्हेगारीविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम

श्रीनगर: जम्मू-काश्मीर पोलिसांनी देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ऑनलाइन गुंतवणूक घोटाळ्यांपैकी एकाचा भंडाफोड केला आहे. फिशिंग आणि बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक करण्यात येत होती. गांदरबल जिल्ह्यातील सफापोरा येथील फिरदौस अहमद यांच्या तक्रारीनंतर तपास सुरू झाला आणि त्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या सिंडिकेटचे धागेदोरे समोर आले. या प्रकरणासाठी एसएसपी खलील पोसवाल यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. तपासात ‘पैसा वॉल्ट’ (paisavault.com) सारख्या बनावट संकेतस्थळांद्वारे जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक उकळली जात असल्याचे स्पष्ट झाले.

या घोटाळ्याचा सूत्रधार हरियाणातील हिसार येथील डॉक्टर एकांत योगदत्त उर्फ ‘डॉक्टर मॉर्फिन’ असल्याचे उघड झाले. फिलीपिन्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्याने ही फसवणुकीची पद्धत शिकल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्याचे संबंध थेट चिनी नागरिकांशी असल्याची माहिती तपासात समोर आली. तो 10 वेगवेगळ्या कोड नेमचा वापर करून लोकांची फसवणूक करत होता. दिल्ली विमानतळावरून चीनहून परतताना त्याला अटक करण्यात आली. तो या संपूर्ण जाळ्याचा ‘टीम लीडर’ असून काही काश्मिरी युवकांच्या मदतीने हे रॅकेट चालवत होता.

हेही वाचा: Balidan Badge: रणरागिणीचा गौरव! 'बलिदान बॅज' मिळवणाऱ्या मेजर दीक्षा ठरल्या देशातील पहिल्या महिला अधिकारी

ही टोळी अत्यंत शिताफीने काम करत होती. काश्मिरी क्षेत्रीय प्रमुख आणि अकाउंट मोबिलायझर्स गरीबी रेषेखालील कुटुंबांना लक्ष्य करत. आठ ते 10 हजार रुपये मासिक कमाईचे आमिष दाखवून त्यांचे बँक खाते आणि एटीएम कार्ड स्वतःकडे घेतले जात. काही बँक कर्मचाऱ्यांनीही या गैरव्यवहारात हातभार लावल्याचा संशय आहे. ते बनावट संकेतस्थळांसाठी बँक खात्यांचे क्यूआर कोड उपलब्ध करून देत होते. गुंतवणूकदारांकडून पैसे जमा होताच ते प्रथम स्थानिक खात्यांत येत आणि त्यानंतर विविध स्तरांतून राज्याबाहेर किंवा परदेशात पाठवले जात.

तपासात आतापर्यंत 800 हून अधिक बँक खात्यांची माहिती समोर आली आहे. प्राथमिक चौकशीत 300 खात्यांतील व्यवहार तपासले असता 250 कोटी रुपयांहून अधिक व्यवहार आढळले. देशभरातील अनेक लोक या फसवणुकीचे बळी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात सुमारे 600 जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, या घोटाळ्याचा दहशतवादी निधीपुरवठ्याशी काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे. मुख्य आरोपीचे वारंवार परदेश दौरे आणि चिनी नागरिकांशी असलेले संबंध लक्षात घेता, या पैशांचा वापर संशयास्पद कारवायांसाठी झाला का, याचा शोध घेतला जात आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांची ही कारवाई सायबर गुन्हेगारीविरुद्ध मोठी मोहीम मानली जात आहे.

हेही वाचा: Fake Currency: पाकिस्तान व्हाया नेपाळ, बनवाट नोटांचा काळाबाजार करणारा लादेन बिहारमधून अटकेत


सम्बन्धित सामग्री