पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यातील मेखलीगंज उपविभागात भारत-बांगलादेश सीमेवर पुन्हा एकदा एका गंभीर घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी दुपारी सनियाजान नदीच्या पात्रात वाळू आणि दगडांची बेकायदेशीर तस्करी होत असल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या निदर्शनास आले. सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान नेहमीप्रमाणे सीमेवर नियमित गस्त घालत असताना, त्यांना भारतीय हद्दीत ही तस्करी सुरू असल्याचे दिसले. जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तस्करांना तेथून निघून जाण्याची ताकीद दिली, मात्र तस्करांनी उलट आक्रमक भूमिका घेतली.
बीएसएफ जवानांवर काठ्या आणि दगडांनी हल्ला
बीएसएफ जवानांनी बेकायदेशीर कृती रोखण्याचा प्रयत्न करताच, बांगलादेशी बाजूने मोठ्या संख्येने समाजकंटक एकत्र झाले. त्यांनी जवानांना लक्ष्य करत त्यांच्यावर काठ्या आणि दगडांनी बेछूट हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सीमेवर अत्यंत गंभीर आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. हल्लेखोरांची संख्या वाढत असल्याचे आणि आपल्या सहकाऱ्यांच्या जीवाला धोका असल्याचे पाहून, बीएसएफ जवानांनी अत्यंत संयम राखून स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तर दिले.
हेही वाचा – भारताला ‘अर्नब’ चक्रीवादळाचा धोका! ‘या’ राज्यातील 5 जिल्ह्यांत शाळा-कॉलेजेस बंद; रेड अलर्ट जारी
ग्रेनेडच्या वापरानंतर तस्कर पसार
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी जवानांनी विशेष ‘स्टन ग्रेनेड’चा वापर केला. ग्रेनेडच्या मोठा आवाजाने हल्लेखोरांची पळापळ झाली आणि सर्व बांगलादेशी समाजकंटक सीमेपलीकडे पळून गेले. या घटनेनंतर कूचबिहार सीमेवर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली असून, अतिरिक्त बीएसएफ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पोलीस आणि बीएसएफ अधिकारी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.