भारत आणि चीनमधील थेट विमानसेवा पाच वर्षांनंतर पुन्हा सुरू होत आहे. कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 26 ऑक्टोबरच्या रात्री इंडिगोची फ्लाइट ग्वांगझोउकडे रवाना होणार आहे. तसेच, 9 नोव्हेंबरपासून दिल्ली ते ग्वांगझोउ या मार्गावरील विमानसेवाही सुरू करण्यात येईल. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील हवाई संपर्क अधिकृतपणे पुन्हा प्रस्थापित झाला आहे.
गलवान खोऱ्यात जून 2020 मध्ये झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीनचे संबंध तणावपूर्ण झाले होते. सीमाभागातील तणाव कमी करण्यासाठी अनेक स्तरांवर चर्चा पार पडली आणि हळूहळू सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर कूटनीतिक संवादाचा नवा अध्याय उघडण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करत आहेत.
31 ऑगस्ट रोजी तियांजिनमध्ये झालेल्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्याबाबत महत्त्वाची चर्चा केली होती. त्यानंतर द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दिशेने ही मोठी पायरी मानली जात आहे. यापूर्वी कैलास मानसरोवर यात्रेची पुनर्बहाली देखील या प्रक्रियेचा भाग होती.
हेही वाचा: Gratuity Rules: केंद्र सरकारचा मोठा निर्णय: 25 लाखांची ग्रॅच्युइटी फक्त कोणाला? नियम जाणून घ्या
चीन आणि भारतात व्यापार, शिक्षण आणि पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना या निर्णयाचा थेट फायदा मिळणार आहे. चीनमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचेल. मेडिकल, व्यवसायिक तसेच धार्मिक प्रवासांसाठीही ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.
अर्थतज्ज्ञांच्या मते, विमानसेवा सुरू झाल्याने आयात-निर्यात आणि व्यवसायिक संपर्क वाढण्याची शक्यता असून, दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांनाही चालना मिळेल. एविएशन क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे की या फ्लाइट्सला चांगला प्रतिसाद मिळाल्यास आगामी काळात मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नईहूनही चीनसाठी थेट उड्डाणे सुरू होऊ शकतात.
एकूणच पाहता, दोन्ही देशांमधील हवाई मार्गाची ही पुनर्बहाली केवळ प्रवासासाठी महत्वाची नसून कूटनीतिक पातळीवर संबंध सुधारणारा एक सकारात्मक टप्पा मानला जात आहे.
हेही वाचा: हादरवून सोडणारी घटना! रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे 5 निष्पाप मुलांना एचआयव्हीची लागण? इथं घडला धक्कादायक प्रकार