नवी दिल्ली : भारताने सदैव युद्धातील कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहिले पाहिजे, असा ठाम संदेश संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी दिला. पाकिस्तानसोबत मे महिन्यात झालेल्या चार दिवसीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्पष्ट केले की, सीमांवर कधीही अचानक परिस्थिती बदलू शकते आणि त्यासाठी तयारी आवश्यक आहे.
एका कार्यक्रमात बोलताना सिंह यांनी म्हटले की, ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने दिलेला प्रतिसाद जगासमोर आपली क्षमता सिद्ध करणारा ठरला. या मोहिमेमुळे युद्धाचा धोका अगदी दारात उभा राहिला होता, तरी भारतीय सैन्याने शौर्य दाखवत सीमांचे रक्षण केले. या घटनेतून भविष्यातील निर्णयांसाठी मार्गदर्शन मिळू शकते आणि ही घटना एक महत्त्वाची केस स्टडी ठरेल, असे त्यांनी सांगितले.
सिंह यांनी स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या वाढत्या सामर्थ्यावर विशेष भर दिला. 2014 पूर्वी संरक्षण उपकरणांसाठी परदेशी आयातीवर अवलंबून राहावे लागायचे, परंतु आता भारतातच मोठ्या प्रमाणात शस्त्रनिर्मिती केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 2014 मधील 46 हजार कोटी रुपयांच्या तुलनेत संरक्षण उत्पादन आज एक लाख 51 हजार कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचले असून, त्यातील 33 हजार कोटी रुपयांचा वाटा खासगी क्षेत्राचा आहे.
हेही वाचा: Uddhav Thackeray : 'अनाकोंडा' म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शाहांवर डागली तोफ; निवडणूक आयोगालाही थेट इशारा! निर्धार मेळाव्यात घणाघात
ते पुढे म्हणाले की, जागतिक परिस्थिती अनिश्चित असल्याने भारताने आपली सुरक्षा धोरणे नव्याने आखण्याची गरज निर्माण झाली आहे. संघर्ष क्षेत्रे जगभरात वाढत असून, भारतासाठी स्वावलंबी होणे हेच सर्वात प्रभावी उत्तर आहे. आकाश मिसाइल प्रणाली, ब्रह्मोस, आकाशतीर यांसह अनेक स्वदेशी तंत्रज्ञानामुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा वाढल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
संरक्षण निर्यातीतही मोठी झेप घेत भारत आता जवळपास 24 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून, मार्च 2026 पर्यंत 30 हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याचा आत्मविश्वास सरकारने व्यक्त केला आहे.
तंत्रज्ञान हस्तांतरणावर अवलंबून न राहता भारताने स्वतःचे संशोधन, डिझाईन आणि उत्पादन व्यवस्थापन मजबूत केले पाहिजे, असा सल्लाही सिंह यांनी उद्योगांना दिला. ‘आपली माती, आपले कवच’ हेच प्रथम प्राधान्य असले पाहिजे, असे सांगत त्यांनी स्वदेशीकरणाला सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ मानले.
हेही वाचा: Nagpur NCP Office Lavani Dance: नागपूरच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणीचा कार्यक्रम; व्हिडिओ व्हायरल होताच विरोधकांकडून जोरदार टीका