Monday, November 17, 2025 12:12:34 AM

Nagpur NCP Office Lavani Dance: नागपूरच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणीचा कार्यक्रम; व्हिडिओ व्हायरल होताच विरोधकांकडून जोरदार टीका

या कार्यक्रमात पक्षाच्या महिला पदाधिकारी आणि प्रसिद्ध नृत्यांगना शिल्पा शाहीर यांनी पारंपरिक लावणी सादर केली.

nagpur ncp office lavani dance नागपूरच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणीचा कार्यक्रम व्हिडिओ व्हायरल होताच विरोधकांकडून जोरदार टीका

Nagpur NCP Office Lavani Dance: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नागपूरमधील गणेशपेठ येथील कार्यालयात आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमावर सध्या राजकीय वादंग उसळले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या गटाने हा कार्यक्रम रविवारी आयोजित केला होता. कार्यक्रमात झालेल्या लावणी सादरीकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या कार्यक्रमावर विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे.

या कार्यक्रमात पक्षाच्या महिला पदाधिकारी आणि प्रसिद्ध नृत्यांगना शिल्पा शाहीर यांनी पारंपरिक लावणी सादर केली. त्यांच्या नृत्याला उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काहींनी “वन्स मोर”च्या घोषणा देत त्यांना पुन्हा सादरीकरण करण्याची विनंती केली. काही क्षणांतच या सादरीकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर सोशल मीडियावरून या संपूर्ण प्रकरणावरून विरोधकांनी निशाणा साधला.  

हेही वाचा -  Sarangi Mahajan on Pankaja Munde: 'ती गुंडगिरीकडे वळली आहे...'; सारंगी महाजन यांची पंकजा मुंडे यांच्यावर खोचक टीका

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. शहराध्यक्ष अनिल अहिरकर आणि जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ताकसाडे यांनी म्हटले की, हा कार्यक्रम पूर्णपणे सांस्कृतिक आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडलेला होता. शिल्पा शाहीर यांनी पारंपरिक लावणी सादर केली, जी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक भाग आहे. यामध्ये कोणताही गैरप्रकार झाला नाही. त्यांनी पुढे म्हटले की, लावणी ही आपल्या राज्याची ओळख आहे. तिचा अपमान होऊ नये किंवा तिला चुकीच्या नजरेतून पाहू नये. तथापि, हा मुद्दा आता राजकीय वादात परावर्तित झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'हा व्हिडिओ पाहून अतिशय अस्वस्थ वाटले. हे दुर्दैवी आहे. पक्ष उभारण्यासाठी अनेकांनी मेहनत घेतली आहे, आणि अशा प्रकारांनी त्या मेहनतीचा अपमान होतो,' असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा - New Maharashtra BJP Office: अमित शहांकडून मुंबईत महाराष्ट्र भाजप कार्यालयाची पायाभरणी; म्हणाले, 'राज्यात भाजपला कोणाच्या पाठिंब्याची गरज नाही...'

याशिवाय, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. हा प्रकार पूर्णपणे निषेधार्ह आहे. संबंधित पदाधिकाऱ्यांकडून याबाबत स्पष्टीकरण मागवले असून, योग्य ती कारवाई केली जाईल, असे पटेल यांनी स्पष्ट केले. पक्ष कार्यालयात लावणीसारख्या सादरीकरणांचे आयोजन करणे कितपत योग्य, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. काहीजणांनी याला सांस्कृतिक कार्यक्रम मानले असले, तरी विरोधकांकडून या प्रकारावरून जोरदार टीका केली जात आहे.
 


सम्बन्धित सामग्री