Saturday, March 07, 2026 05:52:36 AM

India's First Air Taxy : रिक्षा-बसला पर्याय एअर टॅक्सी; अशी आहे भारताची पहिली 'Made in India' एअर टॅक्सी

भारताची पहिली ‘मेड इन इंडिया’ एअर टॅक्सी सेवा 2028 पर्यंत अहमदाबाद, पुणे, चेन्नई आणि बंगळूर येथे सुरू करण्याची तयारी सुरू आहे.

indias first air taxy  रिक्षा-बसला पर्याय एअर टॅक्सी अशी आहे भारताची पहिली made in india एअर टॅक्सी

नवी दिल्ली : एकाच शहरात ऑफिसला जाण्यासाठी एअर टॅक्सीचा वापर...आतापर्यंत ही केवळ कल्पना वाटत होती, मात्र ती आता प्रत्यक्षात उतरणार आहे. रस्त्यांऐवजी आकाशात मार्ग तयार करत देशातील पहिली एअर टॅक्सी सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारची मंजुरी मिळाली असून नागरी विमानन महानिदेशालय (The Directorate General of Civil Aviation, DGCA) सोबत उर्वरित औपचारिकता पूर्ण केल्या जात आहेत.

ही माहिती देशातील पहिली एअर टॅक्सी विकसित करणाऱ्या ‘ई प्लेन’ कंपनीने दिली आहे. भारत मंडपम येथे सुरू असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये या एअर टॅक्सीचे प्रदर्शन करण्यात आले असून देश-विदेशातील तज्ज्ञांनी याची दखल घेतली. विशेष म्हणजे ही संकल्पना पूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ आहे.

हेही वाचा: PM Narendra Modi : AI शिखर परिषदेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित; जगातील दिग्गज नेत्यांसह वरिष्ठ तंत्रज्ञान अधिकाऱ्याचा परिषदेत सहभाग

कंपनीच्या माहितीनुसार, एअर टॅक्सीमध्ये एक पायलट आणि दोन प्रवासी अशा एकूण तीन जणांची व्यवस्था असेल. शहरातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जलद प्रवासासाठी ही सेवा उपलब्ध होईल. 2028 पर्यंत या सेवेची प्रत्यक्ष सुरुवात अहमदाबाद, चेन्नई, पुणे आणि बंगळूर येथे करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर ती टप्प्याटप्प्याने देशभर विस्तारली जाईल. 2021 मध्ये तयार केलेल्या छोट्या मॉडेलने आतापर्यंत 9000 किलोमीटरची चाचणी उड्डाणे पूर्ण केली आहेत.

कंपनीने 2019 पासून आयआयटी मद्रासच्या सहकार्याने या प्रकल्पावर काम सुरू केले होते. बस, ऑटो किंवा रिक्षाप्रमाणेच शहरांतर्गत प्रवासासाठी एअर टॅक्सी वापरता येईल, अशी संकल्पना आहे. सध्याच्या हेलिपॅडचा वापर प्रारंभी केला जाईल; मात्र सेवांचा विस्तार झाल्यानंतर पायाभूत सुविधा वाढवण्याचे नियोजन आहे. बुकिंग प्रक्रियेवरही काम सुरू असून पुढील दोन ते तीन महिन्यांत त्याची रूपरेषा जाहीर होण्याची शक्यता आहे.

याचबरोबर कंपनी एअर ॲम्ब्युलन्स सेवाही विकसित करत आहे. वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या रुग्णवाहिकांऐवजी एअर ॲम्ब्युलन्सद्वारे रुग्णांना जलद गतीने रुग्णालयात पोहोचवता येईल, असा दावा कंपनीने केला आहे. DGCA सोबत मिळून स्वतंत्र उड्डाण मार्ग (कॉरिडॉर) निश्चित करण्यात येत आहेत.

जर सर्व काही नियोजनानुसार झाले, तर काही वर्षांतच महानगरांमध्ये ‘आकाशमार्ग’ हेच नवे वास्तव ठरेल आणि शहरी प्रवासाच्या पद्धतीत मोठा बदल घडेल.

हेही वाचा: Delhi AQI: दिल्लीकरांना भरणार हुडहुडी ; जाता जाता थंडीचा दणका, कर्तव्यपथावर 'मध्यम' श्रेणीचा AQI


सम्बन्धित सामग्री