दिल्लीच्या रोहिणी परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथून दोन दिवसांच्या नवजात शिशूची चोरी झाल्याने मंगळवारी खळबळ उडाली. मात्र दिल्ली पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे उत्तर रोहिणी पोलीस ठाण्याने अवघ्या 12 तासांच्या आत बाळाची सुखरूप सुटका केली. या प्रकरणात आरोपी महिलेबरोबरच तिच्या साथीदारालाही अटक करण्यात आली असून नवजात शिशूला सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रफितीत एक महिला नवजात बाळाला घेऊन बाहेर जाताना दिसली. तपासात उघड झाले की, आरोपीने स्वतःला रुग्णाच्या नातेवाईक म्हणून सादर करत आधी बाळाच्या आईशी ओळख वाढवली आणि हळूहळू तिचा विश्वास संपादन केला. मंगळवारी पहाटे तिने बाळाला खाऊ घालण्याच्या बहाण्याने आईकडून घेतले आणि रुग्णालयातून पसार झाली. आईची झोप उघडल्यावर बाळ आणि महिला दोघेही बेपत्ता असल्याचे लक्षात येताच तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
हेही वाचा: Pune Crime News: आई-भावाच्या डोळ्यांत चटणी फेकली आणि भर बाजारात तरुणीचे अपहरण; संतप्त ग्रामस्थांचा जनआक्रोश मोर्चा
रोहिणी जिल्ह्याचे अतिरिक्त उपायुक्त राजीव रंजन यांनी सांगितले की, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने विशेष पथके स्थापन करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक देखरेख आणि स्थानिक माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. पोलिसांना चकवा देण्यासाठी महिलेने मेट्रो, रिक्षा तसेच इतर वाहनांचा वापर केल्याचे तपासात समोर आले. अखेर सातत्यपूर्ण शोधमोहीम राबवत दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गावरून दोघांना नवजात शिशूसह ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या महिलेचे वय सुमारे 40 वर्षे असून तिचा साथीदार अंदाजे 20 वर्षांचा आहे. दोघेही नोएडाचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाळ सुरक्षित परत मिळाल्यानंतर पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडत पोलिसांचे आभार मानले.
सध्या पोलिस दोन्ही आरोपींची सखोल चौकशी करत असून संभाव्य बालचोरी टोळीशी त्यांचा संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. अलीकडच्या काळात राजधानीत बेपत्ता व्यक्ती आणि बालचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना या प्रकरणातील जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांनी नागरिकांना रुग्णालये आणि सार्वजनिक ठिकाणी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा: Grampanchayat Election 2026: गावगाड्याचा राजकीय 'सारीपाट' सज्ज; 2026 मधील ग्रामपंचायत निवडणुकांचे रणशिंग फुंकले, 'या' तारखेपासून सुरू होणार प्रभाग रचनेची तयारी