India Post Bonus: भारतीय टपाल विभागातील पात्र कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2025-26 करीता उत्पादकता आधारित बोनसला (PLB) अधिकृत मंजुरी दिली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार देशभरातील टपाल कर्मचाऱ्यांना तब्बल 60 दिवसांच्या पगाराएवढा भरघोस बोनस मिळणार आहे. मात्र, प्रत्येक कर्मचाऱ्याच्या हातात पडणारी प्रत्यक्ष रक्कम ही त्यांचा सेवा कालावधी, पात्र वेतन आणि शासनाच्या नियमावलीनुसार ठरवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अशा प्रकारे ठरवले जाईल बोनसचे गणित; कमाल मर्यादेवर आधारित रक्कम
टपाल कर्मचाऱ्यांच्या या बोनसची मोजणी करण्यासाठी मासिक पात्र वेतनाची मर्यादा 7000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. बोनस मोजण्यासाठी (सरासरी मासिक पात्र वेतन गुणिले 60 भागिले 30.4) हे सूत्र वापरले जाणार आहे. या सूत्रानुसार ज्या कर्मचाऱ्याचे सरासरी मासिक पात्र वेतन 7000 रुपये गृहीत धरले जाते, त्यांना अंदाजे 13,816 रुपयांपर्यंतचा बोनस मिळण्याची शक्यता आहे. मात्र, ही केवळ कमाल वेतन मर्यादेवर आधारित अंदाजित रक्कम असून सर्व कर्मचाऱ्यांची अचूक रक्कम त्यांच्या मूळ वेतनावर अवलंबून असेल.
हेही वाचा – HSRP नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई; विशेष तपासणी मोहीम ‘या’ जिल्ह्यात सुरू
एमटीएस, गट क ते ग्रामीण टपाल सेवकांपर्यंत कोणाला होणार फायदा?
टपाल विभागाच्या या विशेष बोनस योजनेचा लाभ मल्टी-टास्किंग स्टाफ म्हणजेच एमटीएस (MTS), गट क आणि पात्र अराजपत्रित गट ब श्रेणीतील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. तसेच, नियमित ग्रामीण डाक सेवकांना (GDS) एक्स-ग्रेशिया स्वरूपात बोनस दिला जाणार आहे. याशिवाय, कंत्राटी किंवा तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही काही निश्चित अटींच्या अधीन राहून अॅड-हॉक बोनसची तरतूद ठेवण्यात आली आहे.
तात्पुरत्या कर्मचाऱ्यांसाठी अटी आणि प्रत्यक्ष वितरणाची प्रतीक्षा
कॅज्युअल स्वरूपात काम करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांनी 31 मार्च 2026 पर्यंत सलग किमान 3 वर्षांची सेवा पूर्ण केलेली असणे बंधनकारक आहे. तसेच त्यांनी वर्षातून किमान 240 दिवस किंवा पाच दिवसांचा आठवडा असलेल्या कार्यालयांसाठी 206 दिवस काम केलेले असणे आवश्यक असून त्यांच्यासाठी 1200 रुपयांची मासिक मजुरी गृहीत धरली जाईल. डाक विभागाने 16 ऑक्टोबर 2026 रोजी यासंदर्भातील आदेश जारी केले असले तरी प्रत्यक्ष पैसे खात्यात कधी जमा होणार याची निश्चित तारीख अधिकृतरीत्या जाहीर झालेली नाही.
हेही वाचा – दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार? ऑक्टोबर संपत आला तरी सप्टेंबरचा हप्ता बाकी
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.