इंदूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या 3 सामन्यांच्या वनडे (One Day International, ODI) मालिकेतील अखेरचा सामना रविवार, 18 जानेवारी 2026 रोजी इंदूरच्या होलकर स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. या निर्णायक लढतीत पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा रोहित शर्मा आणि विराट कोहली या स्टार जोडीवर असतील. कारण या सामन्यानंतर तब्बल सहा महिन्यांपर्यंत हे दोघे भारतीय जर्सीत वनडे खेळताना दिसणार नाहीत. त्यामुळे इंदूरचा हा सामना त्यांच्या चाहत्यांसाठी विशेष भावनिक आणि महत्त्वाचा ठरणार आहे.
नववर्षाची सुरुवात टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेने केली असून, त्यातील दोन सामने आधीच पार पडले आहेत. आता मालिकेतील शेवटच्या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. दीर्घ विश्रांतीनंतर वनडे फॉरमॅटमध्ये मैदानात उतरलेली भारतीय टीम या सामन्यात मालिकेची सांगता दणक्यात करण्याच्या प्रयत्नात असेल. विशेषतः रोहित-विराट या अनुभवी फलंदाजांची कामगिरी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
वनडे मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 (T20 International) मालिका खेळवली जाणार आहे. मात्र या टी20 मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना दिसणार नाहीत, कारण दोघांनीही टी20 इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे वनडे मालिकेतील इंदूरचा सामना हा त्यांच्या चाहत्यांसाठी पुढील अनेक महिन्यांतील शेवटची झलक ठरणार आहे.
हेही वाचा: Akkalkot Accident: स्वामींच्या भेटीची ओढ ठरली शेवटची! दर्शनापूर्वीच पाच भाविकांचा वाटेतच करुण अंत
न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर रोहित आणि विराट जवळपास सहा महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहतील. आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 (ICC T20 World Cup 2026) आणि इंडियन प्रीमियर लीग 2026 (Indian Premier League, IPL) पार पडल्यानंतरच भारतीय संघ पुन्हा वनडे क्रिकेट खेळणार आहे. जून 2026 मध्ये अफगाणिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून, तेव्हा तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल. त्या मालिकेत पुन्हा एकदा रोहित-विराट भारतीय जर्सीत खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
त्यानंतर जुलै 2026 मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून, तेथेही तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. पुढे सप्टेंबरमध्ये बांगलादेश दौरा नियोजित आहे, मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे ही वनडे मालिका होण्याबाबत साशंकता आहे. याच कालावधीत भारताचा वेस्ट इंडीज दौरा देखील ठरलेला असून, तेथे तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2026 मध्ये टीम इंडिया पुन्हा न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. मात्र तोपर्यंत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना सातत्याने संधी मिळेल की निवड समिती त्यांना विश्रांती देण्याचा विचार करेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तोपर्यंत इंदूरचा हा वनडे सामना चाहत्यांसाठी आठवणींचा खास क्षण ठरणार, यात शंका नाही.
हेही वाचा: Narayan Rane On Uddhav Thackeray : 'हे पराभवामुळे डिप्रेशनमध्ये गेले...', भर पत्रकारपरिषदेत नारायण राणे उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलून गेले?