Friday, February 13, 2026 11:00:37 AM

Akkalkot Accident: स्वामींच्या भेटीची ओढ ठरली शेवटची! दर्शनापूर्वीच पाच भाविकांचा वाटेतच करुण अंत

पनवेलमधील सहा जण गुरुवारी पहाटे खाजगी कारने अक्कलकोटच्या दिशेने जात असताना, सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी पाटीजवळ त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला.

akkalkot accident स्वामींच्या भेटीची ओढ ठरली शेवटची दर्शनापूर्वीच पाच भाविकांचा वाटेतच करुण अंत

Akkalkot Accident: श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाची ओढ घेऊन निघालेल्या भाविकांच्या प्रवासाचा शेवट अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक झाला आहे. पनवेलमधील सहा जण गुरुवारी पहाटे खाजगी कारने अक्कलकोटच्या दिशेने जात असताना, सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी पाटीजवळ त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका महाकाय झाडावर कार आदळल्याने झालेल्या या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, पनवेल परिसरातील मित्र आणि नातेवाईक गुरुवारी पहाटेच्या सुमारास स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी निघाले होते. मोहोळ शहराजवळील देवडी पाटी परिसरातून जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार थेट महामार्गालगतच्या जुन्या झाडावर जाऊन धडकली. ही धडक इतकी वेगवान होती की, कारचा पुढचा भाग पूर्णपणे चिरडला गेला. यात विशाल भोसले, अमर पाटील, आनंद माळी, अर्चना भंडारे आणि माला साळवे या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा - Shital Mhatre on Sanjay Raut : 'मातोश्रीची भाकरी खाऊन सिल्व्हर ओकची चाकरी...', शिवसेनेच्या महिला नेत्या संजय राऊतांवर भडकल्या

एक महिला गंभीर जखमी

या भीषण अपघातात ज्योती टकले नावाची महिला सुदैवाने बचावली असली तरी, तिची प्रकृती चिंताजनक आहे. मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार दिल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण पनवेल परिसरात मोठी शोककळा पसरली असून, एकाच भागातील पाच निष्पाप जीवांचा अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा - Atal Setu Toll-Free: मुंबईकर आता सुस्साट! अटल सेतूवरून करा मोफत प्रवास, मात्र 'या' गाड्यांना भरावा लागणार...

डुलकी की तांत्रिक बिघाड? तपास सुरू

पहाटेच्या वेळी हा अपघात झाल्याने, चालकाचा डोळा लागल्यामुळे हा प्रकार घडला असावा किंवा गाडीचा टायर फुटून हा अनर्थ ओढवला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. स्थानिक हॉटेल व्यावसायिक आणि नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले होते. मोहोळ पोलिसांनी या प्रकरणी अपघाताची नोंद केली असून, तांत्रिक बाबींचा तपास केला जात आहे. मात्र, या अपघाताने महामार्गावरील वेगमर्यादा आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला आहे.


सम्बन्धित सामग्री